
- शैक्षणिक सहकार्य आणि क्षमता विकासाला प्रोत्साहन
मुंबई, 13 नोव्हेंबर (हिं.स.) -
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – प्रादेशिक केंद्र, मुंबई (एनएडीटी-आरसी, मुंबई) आणि राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्था, मुंबई (एनआयएसएम, मुंबई) यांनी शैक्षणिक सहकार्य, विशेष प्रशिक्षण, संशोधन आणि व्यावसायिक क्षमता विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आज सामंजस्य करार केला.
या सामंजस्य करारावर एनएडीटी-आरसी, मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर आणि एनआयएसएम, मुंबईच्या निबंधक योगिता श्रीकांत जाधव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. आयकर विभागाच्या प्रशिक्षण संस्था आणि नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये भागीदारी निर्माण करण्यासाठी, आयकर (प्रशिक्षण) विभागाच्या प्रधान महासंचालक रोली अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण संचालनालयाने हाती घेतलेल्या उपक्रमाचा हा एक भाग आहे.
वार्षिक कृती आराखडे आणि विषयाधारित संयुक्त कार्यगटांच्या माध्यमातून या सामंजस्य कराराची अंमलबजावणी केली जाणार आहे. याअंतर्गत क्षमता विकास आणि प्रमाणपत्र कार्यक्रम, भांडवली बाजार, प्रतिभूती नियमन आणि वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) यांवरील विशेष अभ्यासक्रम, प्राध्यापकांची आदानप्रदान प्रक्रिया, सहयोगी संशोधन, केस स्टडी आणि धोरणविषयक शोधनिबंध तसेच वित्तीय बाजारातील संस्थांना भेटी यांना चालना मिळेल. या भागीदारीमुळे भांडवली बाजार, प्रतिभूती व्यवहार, गुंतवणूक उत्पादने आणि डिजिटल वित्त यांसह बदलत्या वित्तीय परिसंस्थेविषयी आयकर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची समज अधिक दृढ होईल.
या प्रसंगी बोलताना एनएडीटी-आरसी, मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर यांनी सांगितले की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एनएडीटी-आरसी, मुंबईला वित्तीय क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्र म्हणून घोषित केले आहे. भांडवली बाजार, प्रतिभूती नियमन आणि वित्तीय तंत्रज्ञान या क्षेत्रांतील एनआयएसएम, मुंबईच्या विशेष कौशल्याचा उपयोग करून विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वित्तीय क्षेत्रातील ज्ञान अधिक सखोल करण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल. त्यामुळे माहितीपूर्ण निर्णयप्रक्रिया आणि प्रभावी कर प्रशासनाला प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
एनआयएसएम , मुंबईच्या रजिस्ट्रार, योगिता श्रीकांत जाधव यांनी, वित्तीय साधनांवरील कर आकारणी आणि आर्थिक बुद्धिमत्तेबाबत विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना व्यावहारिक दृष्टिकोन मिळवून देण्यात या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, एनएडीटी-आरसी , मुंबईसोबतची ही भागीदारी शैक्षणिक सहभागाला अधिक समृद्ध करेल आणि वित्तीय बाजारांच्या वित्तीय व नियामक पैलूंची सखोल समज विकसित करण्यास मदत करेल.
या सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभाला एनएडीटी-आरसी, मुंबईच्या वतीने अतिरिक्त सहाय्यक संचालक राधिका पार्थसारथी आणि अतिरिक्त सहाय्यक संचालक लीलाधर गावकर उपस्थित होते. एनआयएसएम, मुंबईच्या वतीने सेबी (एनआयएसएम-पीएमडी I) च्या उप-महाव्यवस्थापक वंदना जोगळेकर आणि वरिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक तनवीर खान उपस्थित होते.
हा सामंजस्य करार संस्थात्मक सहकार्यासाठी पाच वर्षांची चौकट निश्चित करतो. याद्वारे शैक्षणिक देवाणघेवाण, उपयोजित संशोधन आणि व्यावसायिक उत्कृष्टता यांना प्रोत्साहन देण्याची संयुक्त वचनबद्धता व्यक्त करण्यात आली आहे. हा करार एनएडीटी-आरसी, मुंबईला वित्तीय क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित होण्यास मोलाचा आधार देईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी