लातूर : ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्ह्यातील ५१६ गावांतील २४ हजार ९१७ नागरिकांशी साधला संवाद लातूर, १३ नोव्हेंबर (हिं.स.) : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणे आणि गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या उद्देश
पोलीस उपक्रम


जिल्ह्यातील ५१६ गावांतील २४ हजार ९१७ नागरिकांशी साधला संवाद

लातूर, १३ नोव्हेंबर (हिं.स.) : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणे आणि गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ पासून ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ५१६ गावांना भेटी देत तब्बल २४ हजार ९१७ नागरिकांशी पोलिसांनी थेट संवाद साधला आहे.

या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावोगावी जाऊन शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि सूचना जाणून घेऊन पोलिसांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढण्यासह परस्पर विश्वासाचे नाते अधिक दृढ होत आहे.

ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, पाणी बचतीचे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय पशुधन चोरी, शेतीची अवजारे व विद्युत मोटारींची चोरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.

अवैध सावकारीचे दुष्परिणाम, सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार आणि विविध गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. गावातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याच्या युवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गावांमध्ये हा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. पोलीस अधिकारी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या अडचणी थेट पोलिसांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होत आहे.पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांच्या समन्वयातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध घालणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोलिसांनी थेट गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पोलीस-जनता समन्वयाला नवी दिशा मिळत आहे. नागरिकांनीही आपल्या समस्या, तक्रारी व सूचना पोलिसांपर्यंत पोहोचवून गावाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande