
मुंबई, 13 नोव्हेंबर (हिं.स.) । मुंबईतील प्रा. विजय तापस स्मृती समितीतर्फे महाराष्ट्रातील दिवाळी अंकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दिवंगत प्रा. विजय तापस यांच्या साहित्यिक व सांस्कृतिक योगदानाचे जतन करण्याबरोबरच मराठी दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. प्रा. तापस सरांना संतकविता, प्राचीन साहित्य, पोथी साहित्य आणि जागतिक रंगभूमी या विषयांत विशेष रस होता. मराठी साहित्यसमीक्षक आणि नाट्यसमीक्षक म्हणून ते परिचित होते. ग्रंथ संपादक, भाषांतरकार, साहित्य कला-संस्कृती क्षेत्रातील संशोधक, अभ्यासक, जाहिरात लेखक, माहितीपटांचे लेखक या नात्याने ते वाचक-प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यांना दस्तावेज निर्माण करण्यात आणि एकोणिसाव्या शतकाच्या अभ्यासात संशोधनात विशेष रस होता. त्यांचे मराठी साहित्य, संस्कृती आणि वैचारिक परंपरेच्या संवर्धनासाठी व ते कार्यरत करण्याच्या दृष्टीने स्मृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून प्रकाशित होणाऱ्या मराठी दिवाळी अंकाच्या संपादक व प्रकाशकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी दिवाळी अंकासाठी खुली आहे.
स्पर्धेसाठी केवळ याच वर्षी प्रकाशित झालेले दिवाळी अंक स्वीकारले जातील. प्रत्येक दिवाळी अंकाच्या दोन प्रती नोंदणीकृत टपालाने पाठवाव्यात. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. दिवाळी अंकांचे परीक्षण संपादकीय दृष्टिकोन, साहित्यिक गुणवत्ता, समाज संस्कृतिविषयक भूमिका, विषयवैविध्य, अंकाची मांडणी, निर्मिती मूल्य इत्यादी निकषांवर करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन अंकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह तसेच पाच अंकांना उत्तेजनार्थ म्हणून रोख रक्कम व स्मृतिचिन्हाने गौरविण्यात येईल.
अंक पाठविण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२६ अशी असून दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता असा : प्रा. रघुनाथ राजाराम शेटकर (संयोजक/समन्वयक, स्पर्धा समिती), ए/३/१०२, पुष्पहास सोसायटी, सेक्टर-२, शांतीनगर, साईकृपा हॉस्पिटलच्या वर, मीरा रोड (पूर्व), जि. पालघर ४०११०७. (संपर्क : ९८६९१६७१२४, Email : raghunathshetkar0@gmail.com)
महाराष्ट्रातील सर्व दिवाळी अंकांचे संपादक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे अध्यक्ष डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस आणि कार्यवाह प्रा. ज्योती मालंडकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी