
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। जगभरात गेल्या सुमारे १४ तासांपासून सुरू असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडात आता सुधारणा होण्याची प्राथमिक चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक प्रयत्नांनंतर अखेर मायक्रोसॉफ्टच्या सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. अलीकडेच राबविण्यात आलेल्या सुधारणा उपायांमुळे प्रभावित भागांमधील कंपनीच्या सर्व्हरची स्थिरता आणि क्षमता यामध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येत आहे.
या मोठ्या संकटाच्या काळात वापरकर्त्यांचे महत्त्वाचे संदेश सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने एक मोठे पाऊल उचलले आहे. मायक्रोसॉफ्टने ई-मेलची कालमर्यादा वाढवून आता ४८ तास केली आहे. या निर्णयामुळे तांत्रिक बिघाडादरम्यान अडकलेले किंवा उशिराने पाठवले जाणारे ई-मेल नष्ट होणार नाहीत, तर ते किमान ४८ तास सुरक्षित राहतील.
मायक्रोसॉफ्ट ३६५ स्टेटसकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, या समस्येशी संबंधित सविस्तर माहिती अॅडमिन सेंटरमध्ये इन्सिडेंट क्रमांक एमओ१५५०८२१ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय सामान्य वापरकर्तेही कंपनीच्या सर्व्हिस स्टेटस पेजच्या माध्यमातून ताज्या परिस्थितीवर लक्ष ठेवू शकतात.
मायक्रोसॉफ्टच्या प्राथमिक तपासणीनुसार, सर्व्हर हेल्थ-चेक यंत्रणा अयशस्वी झाल्यामुळे हा संपूर्ण बिघाड निर्माण झाला. सर्व्हरच्या स्थितीशी संबंधित माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या एका विशिष्ट भागात तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्याने प्रभावित सर्व्हर अनुपलब्ध झाले होते. समस्या समोर आल्यानंतर अभियंत्यांच्या पथकाने सुरुवातीला कॉन्फिगरेशनमध्ये बदल केले आणि प्रभावित सर्व्हर पुन्हा सुरू केले. कंपनीने पर्यायी हेल्थ-चेक पद्धतीचाही अवलंब केला. त्यामुळे काही सर्व्हर पुन्हा कार्यरत झाले होते. मात्र, या सर्व्हरवर इंटरनेट वाहतुकीचा दबाव वाढताच त्यांनी पुन्हा काम करणे बंद केले.
पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर मायक्रोसॉफ्टने आपली रणनीती बदलली आणि नव्या तांत्रिक उपायांवर काम सुरू केले. अभियंत्यांनी नेटवर्क ट्रॅफिक पर्यायी मार्गांवर वळवला आणि पायाभूत सुविधांमधील प्रभावित भाग वेगळे केले. यासोबतच सर्व्हरवरील भार कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या येणाऱ्या इंटरनेट वाहतुकीवर तात्पुरते निर्बंधही घालण्यात आले. या नव्या आणि कठोर उपायांचा परिणाम आता दिसू लागला आहे. ज्या भागांमध्ये ट्रॅफिक ऑप्टिमायझेशनचे उपाय लागू करण्यात आले आहेत, तेथे सेवांमध्ये अंशतः सुधारणा नोंदवण्यात आली आहे. मात्र, ही समस्या पूर्णपणे संपल्याची अधिकृत घोषणा कंपनीने अद्याप केलेली नाही. सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी अचानक झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. भारतापासून जपान, युरोप आणि अमेरिकेपर्यंत कोट्यवधी वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट आउटलुक, टीम्स आणि कोपायलट यांसारख्या सेवांचा वापर करता येत नव्हता. जपानमध्ये तर परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, अनेक कार्यालयांना नाइलाजाने अनेक दशकांपूर्वीच्या फॅक्स यंत्रांचा आधार घ्यावा लागला.
या जागतिक तांत्रिक बिघाडाचा परिणाम विमान वाहतूक आणि कॉर्पोरेट क्षेत्रावरही स्पष्टपणे दिसून आला. दिल्ली विमानतळासह अनेक विमानतळांवर विमान कंपन्यांच्या चेक-इन प्रणाली प्रभावित झाल्याने विमानांना विलंब झाला, तर काही उड्डाणे रद्दही करावी लागली. याशिवाय भारतातील अनेक बँका आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या कामकाजाचा वेगही मंदावला होता. मात्र, एचडीएफसी बँकेसारख्या प्रमुख संस्थांनी ग्राहकांना आश्वस्त करत त्यांच्या बँकिंग सेवा पूर्णपणे सुरक्षित आणि सुरू असल्याचे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, एकीकडे जगभरातील कर्मचारी ई-मेल आणि बैठकींच्या सेवा बंद पडल्याने त्रस्त झाले होते, तर दुसरीकडे समाजमाध्यमांवर याबाबत मजेशीर प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. अनेकांनी याला विनामागता मिळालेली सुट्टी असे संबोधत मायक्रोसॉफ्टने नकळत काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखण्याचा नवा मार्ग शोधल्याची मिश्कील टिप्पणी केली.
सध्या जगभरातील कंपन्या आणि कोट्यवधी वापरकर्ते मायक्रोसॉफ्टकडून सेवा पूर्णपणे पूर्ववत झाल्याच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. ई-मेलची कालमर्यादा ४८ तासांपर्यंत वाढवण्यात आल्याने कॉर्पोरेट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण यामुळे कोणताही महत्त्वाचा व्यावसायिक संदेश गमावला जाण्याची भीती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule