
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीच्या मालिकेला आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी ब्रेक लागला. जागतिक बाजारातून मिळालेले कमजोर संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि किरकोळ महागाईचे वाढलेले आकडे यामुळे दिवसभर बाजारावर दबाव कायम राहिला. व्यवहाराच्या अखेरीस बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स ०.३९ टक्के आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ५० निर्देशांक ०.६१ टक्क्यांच्या घसरणीसह लाल निशाणावर बंद झाले.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स आज कमजोर संकेतांमुळे ७७.२३ अंक म्हणजेच ०.०९ टक्क्यांच्या घसरणीसह ८१,८३३.७८ अंकांवर उघडला. बाजार सुरू झाल्यानंतर खरेदीदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे निर्देशांकाच्या हालचालीत सुधारणा होऊ लागली. सातत्याने सुरू असलेल्या खरेदीच्या जोरावर पहिल्या दीड तासाच्या व्यवहारात सेन्सेक्सने सुधारणा करत ८१,८७९.५१ अंकांची पातळी गाठली. त्यानंतर बाजारात पुन्हा एकदा विक्रीचा दबाव सुरू झाला. त्यामुळे निर्देशांकात पुन्हा घसरण होऊ लागली.
सातत्याने सुरू असलेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स ६२२.२६ अंक म्हणजेच ०.७६ टक्क्यांनी घसरून ८१,२८८.७५ अंकांच्या पातळीवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटच्या तासात खरेदीदारांनी पुन्हा जोर लावल्यामुळे निर्देशांकाच्या हालचालीत सुधारणा दिसून आली. दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग, वाहन आणि धातू क्षेत्रातील प्रमुख समभागांमध्ये विक्रीचा दबाव अधिक होता. दिवसभरातील चढ-उतारानंतर सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून ३०३.७० अंकांची सुधारणा केली. मात्र, अखेरीस ३१८.५६ अंक म्हणजेच ०.३९ टक्क्यांच्या घसरणीसह ८१,५९२.४५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टी ५० निर्देशांकानेही आज ८९.५० अंक म्हणजेच ०.३५ टक्क्यांच्या घसरणीसह २५,२०९.८५ अंकांवर व्यवहाराला सुरुवात केली. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच खरेदी सुरू झाल्याने निर्देशांकाच्या हालचालीत सुधारणा होऊ लागली. खरेदीच्या जोरावर निफ्टी ५० निर्देशांकाने उसळी घेत २५,२४६.३५ अंकांची पातळी गाठली. मात्र, त्यानंतर बाजारात पुन्हा विक्री सुरू झाल्याने हा निर्देशांक घसरत गेला.
विक्रीच्या दबावामुळे निफ्टी ५० निर्देशांक २४४.९५ अंक म्हणजेच ०.९७ टक्क्यांनी घसरून २५,०५४.४० अंकांवर आला. व्यवहाराच्या शेवटच्या तासात खरेदीदारांनी पुन्हा खरेदीचा जोर वाढवला. त्यामुळे निर्देशांकाच्या हालचालीत काही प्रमाणात सुधारणा झाली. खालच्या पातळीवर झालेल्या खरेदीमुळे निफ्टी ५० निर्देशांकाने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून ८९.९० अंकांची सुधारणा केली. मात्र, अखेरीस एकूण १५५.०५ अंक म्हणजेच ०.६१ टक्क्यांच्या घसरणीसह २५,१४४.३० अंकांवर व्यवहाराची समाप्ती केली.
क्षेत्रीय स्तरावर आज सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. वाहन, धातू आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी ऑटो निर्देशांक १.०७ टक्के, बीएसई मेटल्स ०.९३ टक्के आणि निफ्टी पीएसई ०.८७ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय निफ्टी बँक ०.७९ टक्के, बीएसई ऑइल अँड गॅस ०.७६ टक्के आणि निफ्टी आयटी ०.७२ टक्क्यांनी घसरून बंद झाले. दुसरीकडे, केवळ बीएसई कॅपिटल गुड्स निर्देशांकच ०.६८ टक्क्यांच्या वाढीसह हिरव्या निशाणावर राहण्यात यशस्वी झाला.
व्यापक बाजारातही आज सातत्याने दबाव कायम होता. त्यामुळे निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.२४ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे स्मॉलकॅप १०० निर्देशांकानेही ०.२६ टक्क्यांच्या घसरणीसह आजच्या व्यवहाराची समाप्ती केली.
आज शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली. बीएसईमध्ये सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य आजच्या व्यवहारानंतर घसरून ५१०.१९ लाख कोटी रुपये (तात्पुरते) झाले. तर मागील व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या कंपन्यांचे बाजारमूल्य ५१३.५५ लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना सुमारे ३.३६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
आज दिवसभराच्या व्यवहारात बीएसईमध्ये ४,६७२ समभागांमध्ये सक्रिय खरेदी-विक्री झाली. त्यापैकी १,९६५ समभाग वाढीसह बंद झाले, तर २,४६२ समभागांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. याशिवाय २४५ समभाग कोणताही बदल न होता स्थिर राहिले. एनएसईमध्ये आज ३,३३१ समभागांमध्ये सक्रिय व्यवहार झाले. त्यापैकी १,२१७ समभाग नफ्यासह हिरव्या निशाणावर, तर २,११४ समभाग घसरणीसह लाल निशाणावर बंद झाले.
त्याचप्रमाणे सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० समभागांपैकी ७ समभाग वाढीसह, तर २३ समभाग घसरणीसह बंद झाले. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या ५० समभागांपैकी ९ समभाग हिरव्या निशाणावर, ४० समभाग लाल निशाणावर, तर एक समभाग कोणताही बदल न होता बंद झाला.
आज घसरणीच्या बाजारातही निफ्टीच्या सर्वाधिक वाढ नोंदवणाऱ्या समभागांमध्ये आयशर मोटर्स १.३४ टक्क्यांच्या वाढीसह ७,६५० रुपयांवर बंद होऊन आघाडीवर राहिला. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर ०.९६ टक्क्यांनी वाढून १,९९२.९० रुपये, बीएसई लिमिटेड ०.७३ टक्क्यांच्या वाढीसह ३,९३७.७० रुपये, एशियन पेंट्स ०.५३ टक्क्यांच्या मजबुतीसह २,५५० रुपये आणि भारती एअरटेल ०.४८ टक्क्यांच्या वाढीसह २,१०६ रुपयांवर बंद झाला. या समभागांचा निफ्टीच्या सर्वाधिक वाढ नोंदवणाऱ्या पहिल्या पाच समभागांमध्ये समावेश झाला.
दुसरीकडे, मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावाखाली असलेल्या निफ्टीच्या सर्वाधिक घसरण नोंदवणाऱ्या समभागांमध्ये श्रीराम फायनान्स ३.३७ टक्क्यांच्या घसरणीसह ९७० रुपयांवर बंद होऊन पहिल्या क्रमांकावर राहिला. त्याचबरोबर टीएमपीव्ही ३.३१ टक्क्यांनी घसरून २८७.४० रुपये, ग्रासिम इंडस्ट्रीज २.६० टक्क्यांच्या घसरणीसह ३,०३४ रुपये, हिंडाल्को इंडस्ट्रीज २.१२ टक्क्यांच्या घसरणीसह ९४३.६० रुपये आणि अदानी एंटरप्रायझेस १.९५ टक्क्यांच्या घसरणीसह २,६८८ रुपयांवर बंद झाले. या समभागांचा आजच्या व्यवहारातील सर्वाधिक घसरण नोंदवणाऱ्या पहिल्या पाच समभागांमध्ये समावेश झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule