लातूर मध्यवर्ती बसस्थानकात दुचाकी आणि खासगी चारचाकी वाहनांचा बिनदिक्कत वावर
लातूर, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर सध्या प्रवाशांनी फुलून गेलेला आहे, अशातच स्थानकात दुचाकी आणि चारचाकी वाहन बिनदिक्कतपणे ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकात दुचाकी आणि चारचाकी खाजगी वाहनांची बेसुमार वर्
बसस्थानक


लातूर, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर सध्या प्रवाशांनी फुलून गेलेला आहे, अशातच स्थानकात दुचाकी आणि चारचाकी वाहन बिनदिक्कतपणे ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकात दुचाकी आणि चारचाकी खाजगी वाहनांची बेसुमार वर्दळ वाढल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. रोज सकाळ-संध्याकाळ येथे अपघाताला आमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण होत आहे.

लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज हजारो प्रवासी ग्रामीण भागातून शहरात येतात. विद्यार्थी, नोकरदार, महिला, वृद्ध, रुग्ण यांची येथे मोठी गर्दी असते. त्यातच दिवाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. बसस्थानकाच्या आत बसेस लागतात त्या फलाटापर्यंत खाजगी दुचाकी बिनदिक्कत घुसतात. काही चारचाकी चालक तर आपली कार थेट बसच्या समोर उभी करतात. त्यामुळे चालकाला बस वळवताना कसरत करावी लागते. प्रवाशांना बस पकडण्यासाठी जीव मुठीत धरून धावावे लागते. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून एखादा अपघात घडण्याआधी यावर पायबंद घालणे गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी, महिला प्रवासी, वृद्ध, दिव्यांग यांना दुचाकी, चारचाकी वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे.

बसस्थानक प्रशासन, वाहतूक पोलीस यांचे याकडे दुर्लक्ष आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नसल्याने कोणीही, कधीही गाडी आत घेऊन येतो. बसस्थानकाबाहेरही परिस्थिती वेगळी नाही. ऑटो रिक्षांची बेशिस्त रांग, टपरीधारकांचे अतिक्रमण, खाजगी जीप-कार यामुळे मुख्य रस्ता पूर्णपणे जाम होतो. बसस्थानकातून बाहेर पडायला बसला १५ ते २० मिनिटे लागतात.

मध्यवर्ती बसस्थानकात खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांना तात्काळ पूर्ण बंदी घालावी. प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स आणि सुरक्षा रक्षक तैनात करावेत. खाजगी वाहनांसाठी बसस्थानकाबाहेर स्वतंत्र 'ड्रॉप अँड पिकअप' पॉईंट तयार करावा. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, गाड्या जप्त कराव्यात. बसस्थानक परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवावे. बसस्थानक हे सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी आहे त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी मागणी माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande