
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर (हिं.स.)| भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी १४ नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील नामसाई येथील गोल्डन पॅगोडा येथे दाखल झाल्या. राज्यातील अस्थी प्रदर्शनाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा आहे. राज्यपाल लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक (निवृत्त) यांनी नामसाई येथे या पवित्र अस्थींचे स्वागत केले. भाविकांना २० नोव्हेंबरपर्यंत गोल्डन पॅगोडा येथे या पवित्र अस्थींचे दर्शन घेता येणार आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माहितीनुसार, नालुंग हेलिपॅड येथे औपचारिकरीत्या स्वीकारल्यानंतर या पवित्र अस्थी गोल्डन पॅगोडा (कोंगमु खाम) येथे स्थापित करण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री चौना मीन, राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि बौद्ध धर्मगुरू उपस्थित होते. त्यानंतर राज्यपालांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले की, भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी त्यांच्या जीवनाचे, ज्ञानप्राप्तीचे आणि शाश्वत शिकवणीचे प्रतीक आहेत. संघर्ष, असहिष्णुता आणि हिंसाचाराच्या काळात शांतता, करुणा, ज्ञान आणि अहिंसेचा बुद्धांचा संदेश विशेष महत्त्वाचा आहे. लोकांनी ही मूल्ये आपल्या जीवनात अंगीकारावीत आणि सद्भावना तसेच परस्पर आदरावर आधारित समाज निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गोल्डन पॅगोडा येथील ध्यान केंद्रात दोन विशेष प्रदर्शनांचेही उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अनअर्थिंग द सेक्रेड पिपरहवा : द स्टोरी ऑफ द होली बुद्धा रेलिक्स अँड देअर डिस्कव्हरी’ या प्रदर्शनात उत्तर प्रदेशातील पिपरहवा येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून समोर आलेल्या बाबी तसेच भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व दर्शवण्यात आले आहे. यामध्ये पिपरहवा रत्नसंग्रहाचा प्रवास आणि एका शतकाहून अधिक काळानंतर २०२५ मध्ये त्याचे भारतात झालेले पुनरागमन यांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘क्रॉसरोड्स ऑफ धम्मा : क्लासिकल लेगेसीज, लिव्हिंग आर्ट अँड अँथ्रोपोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हज’ या प्रदर्शनात बौद्ध धर्माची कला, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्यात आला आहे.
यापूर्वी पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बोमडिला येथील थुबचोग गत्सेल लिंग मठात ८ ते १३ नोव्हेंबरदरम्यान सहा दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात ३५ हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. त्याआधी ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान तवांग मठात आयोजित प्रदर्शनाला ३१ हजारांहून अधिक भाविकांनी भेट दिली होती. अशा प्रकारे तवांग आणि बोमडिला येथे एकूण ६६ हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र अस्थींचे दर्शन घेतले.
अरुणाचल प्रदेशात १३ वर्षांच्या अंतरानंतर पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. नामसाई येथे १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान दर्शनासाठी ठेवल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी या पवित्र अस्थी नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात परत नेण्याचे नियोजन आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule