
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण संबंध आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मसूद मलिक २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
तीन वर्षांहून अधिक काळानंतर पाकिस्तानमधील एखाद्या मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा असेल. त्यामुळे दोन्ही देशांमधील संवाद आणि संबंध सुधारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यापूर्वी मे २०२३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी भारतात आले होते. गोवा येथे झालेल्या एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला होता. आता मुसादिक मसूद मलिक एससीओच्या बैठकीसाठी दिल्लीला येणार आहेत.इस्लामाबादने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात होणाऱ्या एससीओ संमेलनासाठी पाकिस्तान आपला एक मंत्री भारतात पाठवणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा असेल.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) 'सभ्यता संवाद' या कार्यक्रमात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतील. मे २०२५ मध्ये झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा असेल. या कार्यक्रमासाठी पाकिस्तानचे सांस्कृतिक मंत्री औरंगजेब खान खिची यांना निमंत्रित करण्यात आले होते. या मंचाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी चीनमधील तियानजिन येथे झालेल्या एससीओच्या बैठकीदरम्यान मांडला होता. एससीओच्या १० सदस्य देशांसह १५ संवाद भागीदार देशांच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रदर्शन करणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन देणे हा या मंचाचा मुख्य उद्देश आहे.
२०१६ मध्ये झालेल्या पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये खंड पडला होता. त्यानंतर गेल्या दशकभरात भारताला भेट देणारे मुसादिक मलिक हे पाकिस्तानचे तिसरे मंत्री ठरणार आहेत.यापूर्वी केवळ दोन पाकिस्तानी मंत्र्यांनी भारताला भेट दिली होती. २०१६ मध्ये अमृतसर येथे झालेल्या 'हार्ट ऑफ एशिया' बैठकीसाठी सरताज अजीज भारतात आले होते. त्यानंतर २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या बैठकीसाठी बिलावल भुट्टो भारतात आले होते.
२०२४ मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एससीओच्या 'शासनप्रमुखांच्या परिषदे'च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला गेले होते. २०१५ मध्ये सुषमा स्वराज यांच्या दौऱ्यानंतर पहिल्यांदाच भारताचा एखादा मंत्री पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता.मात्र, या सर्व भेटी बहुपक्षीय स्वरूपाच्या होत्या. भारताने पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाहीत, अशी भारताची ठाम भूमिका आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode