लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत ९९.४० टक्के विक्रमी मतदान
लातूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.) लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर अत्यंत उत्साहात आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या मतदानात जिल्ह्यात तब्बल
जिल्हा बँक निवडणूक


लातूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.) लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर अत्यंत उत्साहात आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या मतदानात जिल्ह्यात तब्बल ९९.४० टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, निलंगा, उदगीर, देवणी, जळकोट आणि चाकूर या पाच तालुक्यांमध्ये १०० टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील एकूण ९९९ नोंदणीकृत मतदारांपैकी ९९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १७० महिला आणि ८२३ पुरुष मतदारांचा समावेश आहे. केवळ सहा मतदारांनी मतदान केले नसल्याचे अंतिम आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सकाळपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजेपर्यंत ३६७ मतदारांनी मतदान केले होते. त्यावेळी मतदानाची टक्केवारी ३६.७४ होती. दुपारी १२ वाजेपर्यंत ७९३ मतदारांनी मतदान केल्याने ही टक्केवारी ७९.३८ वर पोहोचली. दुपारी २ वाजेपर्यंत ९४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अखेर दुपारी ४ वाजता मतदान प्रक्रिया संपली तेव्हा ९९३ मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली.

तालुकानिहाय मतदानाची स्थिती

लातूर तालुक्यात २६३ पैकी २६१ मतदारांनी मतदान केले. औसा तालुक्यात ११७ पैकी ११६ मतदारांनी मतदान केले. निलंगा येथे १३७, उदगीर येथे १०८, देवणी येथे ४६, जळकोट येथे ४८ आणि चाकूर येथे ६६ मतदारांनी शंभर टक्के मतदान केले.

शिरूर अनंतपाळ येथे ४३ पैकी ४२, अहमदपूर येथे १०० पैकी ९९, तर रेणापूर येथे ७१ पैकी ७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर झालेल्या विक्रमी मतदानामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग अधोरेखित झाला आहे. आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande