
* जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोलीत ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळा
* प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुमारे तीन हजार कोटींच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन
गडचिरोली, 15 नोव्हेंबर (हिं.स.) -
नक्षलवादी हिंसाचाराच्या प्रभावातून बाहेर पडत देशातील आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होत असून आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते देशभरातील सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा येथील तीन आदिवासी लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांची माहिती घेतली.
या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यसभा सदस्य माया इवनाते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाच्या सचिव रंजना चोप्रा यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.
आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला राष्ट्रीय सन्मान – प्रधानमंत्री
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘जोहार’ या पारंपरिक अभिवादनाने केली. गडचिरोलीतील मोठ्या जनसमुदायाचे आणि आदिवासी संस्कृतीचे कौतुक करत त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्यासह क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, राघोजी भांगरे, खाज्या नाईक, राणी दुर्गावती, टंट्या भिल्ल आणि अन्य आदिवासी स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या योगदानाचे स्मरण केले.
नक्षलवादी हिंसाचारामुळे अनेक दशके आदिवासी समाजाच्या विकासात अडथळे निर्माण झाले. मात्र, सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न आणि केंद्र व राज्य शासनाच्या विकासाभिमुख धोरणांमुळे परिस्थितीत मोठा बदल होत आहे. पूर्वी हिंसाचाराच्या छायेत असलेल्या भागांमध्ये आता शाळा, रस्ते, आरोग्य सुविधा, उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात देशाने महत्त्वपूर्ण प्रगती केली असून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या समाजघटकांना प्राधान्य देण्यात येत आहे. ‘वंचितों को वरीयता’ या धोरणानुसार दुर्गम आदिवासी वस्त्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
पीएम जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये पक्की घरे, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या राष्ट्रीय सोहळ्यात विविध राज्यांतील एकलव्य आदर्श निवासी शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे, आदिवासी संशोधन संस्था आणि बहुउद्देशीय केंद्रांशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील २२ आश्रमशाळा व वसतिगृहांशी संबंधित सुविधांचाही समावेश आहे.
आदिवासी समाजाचा विकास करताना त्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणे आवश्यक आहे. ‘विकास आणि विरासत’ या संकल्पनेतून आधुनिक सुविधा आणि पारंपरिक संस्कृती यांची सांगड घालण्यात येत असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तीन राज्यांतील आदिवासी लाभार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांचा संवाद
यवतमाळच्या कृष्णा टेकाम यांना पीएम जनमनमधून पक्के घर
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी समाजाचे कृष्णा नागोराव टेकाम यांनी प्रधानमंत्री जनमन अभियानातून पक्के घर आणि शौचालय मिळाल्यामुळे कुटुंबाच्या जीवनात झालेला बदल सांगितला. पूर्वी कच्च्या घरात पावसाळ्यात अनेक अडचणी येत होत्या. आता सुरक्षित निवारा उपलब्ध झाला असून गावात पाणी आणि वीज यांसारख्या सुविधाही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कोलाम समाजाच्या सांस्कृतिक परंपरांविषयीही प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विकासाबरोबरच सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
बांबू हस्तकलेतून गुजरातच्या वजीरभाईंचे उत्पन्न वाढले
गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील वजीरभाई भागणाभाई कोतवालिया यांनी बांबू हस्तकलेच्या प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या संधी वाढल्याचे सांगितले. पूर्वी मासिक सात ते आठ हजार रुपये असलेले उत्पन्न आता २० ते २५ हजार रुपयांपर्यंत वाढले आहे. ट्रायफेड आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून हस्तकला उत्पादनांना देशभरातील प्रदर्शनांमध्ये बाजारपेठ मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून बांबू हस्तकलेला स्थानिक स्तरावरून जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
एकलव्य शाळेतून आयआयटी कानपूरपर्यंत अन्वेषची झेप
तेलंगणातील लंबाडी आदिवासी समाजातील सबावत अन्वेष याने एकलव्य आदर्श निवासी शाळेत शिक्षण घेऊन आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळविल्याचा अनुभव सांगितला. मोफत शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या मार्गदर्शनामुळे उच्च शिक्षणाची संधी मिळाल्याचे त्याने नमूद केले. भविष्यात वायुप्रदूषण कमी करण्यासाठी संशोधन करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. प्रधानमंत्र्यांनी त्याचे आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन करून आदिवासी युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या तीनही लाभार्थ्यांचे अनुभव हे शासकीय योजनांमुळे आदिवासी समाजाच्या जीवनात घडणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाचे उदाहरण असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
आदिवासी महानायकांच्या योगदानाला राष्ट्रीय सन्मान – केंद्रीय मंत्री जुएल ओराम
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. २०१६ मध्ये आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जतन करण्यासाठी ११ संग्रहालयांची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी पाच संग्रहालयांची उभारणी पूर्ण झाल्याचे केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम यांनी सांगितले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त २०२१ पासून जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्र्यांनी २०२३ मध्ये बिरसा मुंडा यांच्या उलिहातू येथील जन्मगावी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. जनजातीय गौरव दिनाला देशव्यापी स्वरूप प्राप्त झाले असून मागील वर्षी देशभरातील दोन लाखांहून अधिक ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी नागरिकांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
गडचिरोलीतील राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे कौतुक करताना ओराम यांनी भगवान बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांच्या जीवनकार्यावर आधारित नृत्यनाट्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजातीय गौरव पदयात्रेचा विशेष उल्लेख केला. या आयोजनाबद्दल त्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके आणि आयोजकांचे अभिनंदन केले.
पीएम जनमन, धरती आबा अभियान, एकलव्य निवासी शाळा आणि वनहक्कांशी संबंधित उपक्रमांमुळे आदिवासी समाजाच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जनजातीय गौरव दिनातून आदिवासी समाजाच्या शौर्याला राष्ट्रीय सन्मान – डॉ. अशोक वूईके
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून भगवान बिरसा मुंडा यांच्यासह आदिवासी समाजातील क्रांतिवीरांच्या कार्याला अभिवादन केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने दिलेले योगदान आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा, या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून घोषित केला. गडचिरोलीत या राष्ट्रीय सोहळ्याचे आयोजन होणे ही आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक आदिवासी पद्धतीने मान्यवरांचे स्वागत
कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम यांचा पारंपरिक आदिवासी पद्धतीने सत्कार करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा, पारंपरिक शेला आणि मोरपिसांचा टोप देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात तयार करण्यात आलेली भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा मान्यवरांना प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपस्थित सर्व मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, आदिवासी बांधव, कलाकार आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी