
भारताकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर (हिं.स.) : अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ऑरोरा परिसरात एका हिंदू मंदिराला लक्ष्य करून सामूहिक गोळीबार घडवून आणण्याचा कथित कट रचण्यात आल्याच्या वृत्तांवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या कथित कटामागे हिंदूविरोधी आणि वंशद्वेषी भावना असल्याचे तसेच भारतीय वंशाच्या नागरिकांविरोधात हिंसाचार घडवण्याच्या बाबी समोर आल्याने भारताने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात सांगितले की, या प्रकरणात अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईची भारताला माहिती आहे. संबंधित संशयिताला अटक करून ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपांचीही भारताने दखल घेतली आहे.
जयस्वाल म्हणाले की, अमेरिकेत वाढत असलेल्या वंशद्वेषी भावना आणि भारतविरोधी द्वेषाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक चिंताजनक आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक सतर्कता बाळगणे, द्वेषातून प्रेरित हिंसाचाराबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण राबवणे आणि भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
तसेच, अमेरिकेतील संबंधित यंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करतील, दोषींना कायद्याच्या कक्षेत आणतील आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतील, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी