
- व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
- भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.) - अजितदादांच्या अपघातामागे असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एक नेता करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या आधी केला होता. त्याचं नाव आता रोहित पवारांनी जाहीर केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रोहित पवार यांनी केला. मफलर मॅन हे देवेंद्र फडणवीस हेच असल्याचेही त्यांनी रोहित सिंग यांच्यासमवेतचा मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो दाखवत म्हटले. देवेंद्र फडणवीस हे व्ही.के. सिंहच्या जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्यांनीच या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यामध्ये जर चूक असेल तर सरकारने तपास करावा, असं आव्हानही रोहित पवार यांनी दिले. या सरकारने व्ही.के. सिंह आणि त्याच्या कंपनीला जरी वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचं सरकार आलं तर त्याला सोडणार नाही. त्यांचा हा पुतण्या कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. महत्त्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर परिसर आणि पुणे येथे ‘मफलर’चे चित्र असलेले, पण नावाशिवायचे रहस्यमयी पोस्टर्स झळकले होते. त्यानंतर हा मफलर मॅन कोण याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात किंवा घातपातामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो आमच्याकडे अनेक दिवसांपासून होता. पण यांच्याकडे सत्ता आहे. पंतप्रधानांपासून ते सीबीआय त्यांचे ऐकत असतानाही आतापर्यंत तपास का होऊ शकला नाही? असा प्रश्न आम्हाला होता. पण त्यानंतर व्ही. के. सिंग याच्या जवळ राज्याचे मुख्यमंत्री असल्याने तपास होत नाहीय, असे ठाम मत आमचे झालं. तसेच राघव हा रोहित सिंहचा अतिशय घनिष्ठ मित्र आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार होता, त्याच दिवशी आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री हे जयपूरला जाऊन त्या लग्नात फक्त दीड तासांसाठी सहभागी झाले होते. आता माझ्या एखाद्या भावाचं किंवा बहिणींच लग्न असतं तर मी गेलो नसतो. कारण निवडणुकीमुळे माझ्यावर प्रेशर असतं, परंतु तरी देखील देवेंद्र फडणवीस तिथे का गेले? तर कदाचित संबंध हे फार महत्त्वपूर्ण आणि जवळचे होते, असा दावा करत रोहित पवार यांनी हिंमत असेल तर व्हीएसआर आणि व्ही. के. सिंहवर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. तसेच आमचे सरकार कधी ना कधी येईल. म्हणून पुन्हा तो डायलॉग म्हणतो. पाताळात असो नाही तर आकाशात असो, कुठेही असला तरी, शब्द देतो की अजितदादांच्या घातापातमध्ये किंवा अपघातामध्ये जो कोणी जबाबदार असेल त्याला तुम्ही तरी सोडून द्याल, पण हा कार्यकर्ता आणि हा त्यांचा पुतण्या अजिबात सोडणार नाही, हा माझा शब्द आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांच्या आरोपांवर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेले आरोप अत्यंत खालच्या पातळीचे असून, ते केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असे वक्तव्य करत आहेत. रोहित पवार यांनी आरोप करण्यापूर्वी स्वतःची राजकीय उंची लक्षात घ्यावी. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची प्रतिमा मलिन करू नये, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, संबंधित विमान कंपनीच्या विमानातून राज्यातील जवळपास ९० टक्के नेत्यांनी प्रवास केला असेल. स्वतः रोहित पवार यांनीही अनेकदा या कंपनीच्या विमानातून प्रवास केला असून, त्यासंदर्भातील छायाचित्रे उपलब्ध आहेत. एखाद्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास केला म्हणजे त्या कंपनीशी संबंधित व्यक्तींशी राजकीय संबंध आहेत, असा अर्थ होत नाही. अशा प्रकारचे आरोप करणे म्हणजे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम रोहित पवारांना आवडला नसावा आणि त्या कार्यक्रमाचे महत्त्व कमी करण्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचे आरोप केले असावेत, अशी शक्यताही बावनकुळे यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांनी नेहमीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा असा हव्यास दाखवला नाही. रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याकडून राजकीय संस्कृती कशी जपावी, हे शिकण्याची गरज आहे. रोहित पवार यांचे वक्तव्य बालिशपणाचे असून, अशा प्रकारच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय उंची कमी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही रोहित पवार यांच्या आरोपांबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्यायला हवे.
फडणवीस-अजितदादांचे संबंध भावासारखे होते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. दोघांनीही एकमेकांना भावाप्रमाणे सांभाळले आहे. अजितदादांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून रोहित पवार महाराष्ट्राची प्रतिमा खराब करत आहेत. आमचे सुरुवातीपासूनचे म्हणणे आहे की, अजितदादांच्या विमान अपघातामागील संपूर्ण सत्य समोर आले पाहिजे आणि या घटनेचा पूर्णपणे पर्दाफाश झाला पाहिजे. यासाठी देवेंद्रजी स्वतः खूप प्रयत्न करत आहेत. त्यांनी यासाठी काय काय प्रयत्न केले आहेत, याची मला माहिती आहे; मात्र काही गोष्टी ते सार्वजनिकरीत्या सांगू शकत नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले.
अशा आरोपांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ज्यांच्याशी आमचे पारिवारिक संबंध आहेत, अशा व्यक्तींवर अशा प्रकारचे आरोप केले जातात, याचे दुःख वाटते. अशा व्यक्तींना मानहानीची नोटीस पाठवायची का? खरे तर रोहित पवार यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे. राज्यातील जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा कमी झाली आहे, हीच त्यांच्यासाठी मोठी मानहानी आहे, असे बावनकुळे यांनी सुनावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी