
अंधेरी स्थानकाजवळ दोन प्रवाशांच्या वादातून घडली घटना
आरोपीला अटक, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई, १७ नोव्हेंबर (हिं.स.) : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ चालत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादातून एका निष्पाप प्रवाशाला गंभीर दुखापत झाली. भांडणादरम्यान एका तरुणाने भिरकावलेले धारदार हत्यार दरवाजाजवळ उभ्या असलेल्या ५२ वर्षीय सुरेश शर्मा यांच्या छातीत घुसले. या हल्ल्यात शर्मा गंभीर जखमी झाले असून अंधेरी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश द्वारका शर्मा (५२) हे मूळचे झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील सायन-धारावी परिसरात राहतात. सुतारकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १५ नोव्हेंबर रोजी ते कामानिमित्त बोरीवली पूर्व येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी १२.५८ वाजण्याच्या सुमारास त्यांनी बोरीवली रेल्वे स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल पकडली. ते पहिल्या सर्वसाधारण डब्यात दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करत होते.
दरम्यान, त्यांच्या मागील बाजूस बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. अंधेरी स्थानक जवळ येताच हा वाद अधिकच चिघळला. लोकल अंधेरी स्थानकात थांबल्यानंतर त्यापैकी एक तरुण फलाटावर उतरला, तर दुसरा डब्यातच राहिला. फलाटावर उतरलेला तरुण डब्यातील प्रवाशाला शिवीगाळ करत होता.
लोकल स्थानकातून पुढे निघत असताना संतापलेल्या तरुणाने हातातील धारदार हत्यार डब्याच्या दिशेने भिरकावले. मात्र, हे हत्यार संबंधित प्रवाशाला न लागता दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला घुसले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे डब्यात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेले शर्मा रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
घटनेनंतर सहप्रवाशांनी प्रसंगावधान राखत लोकलची साखळी ओढून गाडी थांबवली. लोकल वांद्रे स्थानकात पोहोचल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी जखमींना तातडीने मदत केली. त्यांना स्थानकातील कार्यालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणातील आरोपी शिवाजी लक्ष्मण गायकवाड (२५, रा. निफाड, नाशिक) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विनातिकीट प्रवास करत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. घटनेचे ठिकाण अंधेरी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे मुंबईच्या लोकल प्रवासातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule