
राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शपथविधी
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. संसद भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. पुरी यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली.
या शपथविधी समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय पंचायती राज, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी तसेच संसदीय सचिवालयातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
मध्य प्रदेशातून बिनविरोध निवड
उल्लेखनीय म्हणजे, हरदीप सिंह पुरी यांची ५ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली होती. राज्यसभेचे सदस्य एल. मुरुगन यांनी राजीनामा दिल्यानंतर संबंधित जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत पुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून येण्यापूर्वी पुरी यांनी उत्तर प्रदेशातून असलेल्या आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या उत्तर प्रदेशातील सदस्यत्वाचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२६ मध्ये संपणार होता.
राज्यसभेतील नव्या सदस्यत्वाला प्रारंभ
मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवड झाल्यानंतर शपथविधीची औपचारिकता पूर्ण झाल्याने हरदीप सिंह पुरी यांच्या नव्या सदस्यत्वाला अधिकृत प्रारंभ झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळतानाच आता ते मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व राज्यसभेत करणार आहेत.त्यांच्या शपथविधीमुळे संसदेतील मध्य प्रदेशच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनेही या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule