बँकिंग क्षेत्राच्या जोरावर शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सेन्सेक्स ४२७.४० अंकांनी वधारला
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। जागतिक बाजारांमध्ये कमजोरीचे वातावरण असतानाही भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम ठेवली. बँकिंग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेली जोरदार खरेदी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या
Stock market rises in early trade, Sensex and Nifty rise


नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। जागतिक बाजारांमध्ये कमजोरीचे वातावरण असतानाही भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम ठेवली. बँकिंग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेली जोरदार खरेदी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला गुंतवणुकीचा ओघ यामुळे बाजाराला चांगला आधार मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी वाढ नोंदवली. मात्र, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० मागील बंद पातळीच्या तुलनेत किंचित घसरणीसह २५,२७७.३० अंकांवर खुला झाला. सुरुवातीला बाजारात संथ व्यवहार झाले. त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी वाढल्याने निफ्टीने वेग पकडला आणि व्यवहारादरम्यान २५,५०१.३५ अंकांचा उच्चांक गाठला. मात्र, उच्च पातळीवर काही प्रमाणात नफावसुली झाल्याने तेजीला मर्यादा आल्या. अखेर निफ्टी ९६.३० अंकांची म्हणजेच ०.३८ टक्क्यांची वाढ नोंदवत २५,३८७.४० अंकांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८२,१५०.६२ अंकांवर खुला झाला. दिवसभरातील व्यवहारात त्याने ८२, ८९७.४९ अंकांचा उच्चांक, तर ८२,०९१.९० अंकांचा नीचांक नोंदवला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने ७९२.७ अंकांची म्हणजेच ०.९६ टक्क्यांची झेप घेत ८२,८९७.४९ अंकांची उच्चांकी पातळी गाठली. अखेर बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ४२७.४० अंकांनी म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी वधारून ८२,५३२.१९ अंकांवर बंद झाला.

बाजारातील तेजीमागे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी महत्त्वाची ठरली. सलग दोन महिने भारतीय बाजारातून पैसा काढून घेतल्यानंतर नोव्हेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय झाले आहेत. या महिन्यात त्यांची गुंतवणूक जवळपास १० अब्ज डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. १६ नोव्हेंबर रोजी परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४ हजार ८६४.६८ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३ हजार ५१९.०५ कोटी रुपयांचे समभाग विकले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारतीय बाजाराला आणखी दिलासा मिळाला. ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल ९१.७० डॉलरच्या आसपास व्यवहार करत होते. जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा सुधारण्याच्या अपेक्षा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहतुकीत होत असलेली सुधारणा यामुळे किमतींवरील दबाव कमी झाला. भारत हा मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करणारा देश असल्याने या घसरणीचा अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची अपेक्षा आहे.

क्षेत्रनिहाय व्यवहारात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सर्वाधिक चमक दाखवली. निफ्टी सार्वजनिक क्षेत्रातील बँक निर्देशांक १.९५ टक्क्यांनी वधारला. स्थावर मालमत्ता क्षेत्र १.९४ टक्के, बँकिंग क्षेत्र १.१३ टक्के आणि वाहन क्षेत्र ०.७२ टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक ०.९० टक्क्यांनी घसरला. ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातही किरकोळ घसरण झाली.

दरम्यान, मध्यम कंपन्यांच्या समभागांमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ झाली, तर लघु कंपन्यांचा निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी घसरला. भारतीय रुपयानेही डॉलरच्या तुलनेत मोठी सुधारणा नोंदवली. रुपया ०.५ टक्क्यांनी वधारून एका डॉलरमागे ९३.४७ रुपयांवर बंद झाला. ही मागील सात महिन्यांतील रुपयाची सर्वोत्तम पातळी ठरली. परकीय गुंतवणुकीचा ओघ, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे भारतीय शेअर बाजारातील तेजी कायम राहिली.

सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अदानी पोर्ट्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.

तर एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स घसरणाऱ्या कंपन्यांमध्ये होते. सोमवारी सेन्सेक्स ५१२.३४ अंकांनी म्हणजेच ०.६३ टक्क्यांनी वाढून ८२,१०४.७९ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी १४६.८० अंकांनी म्हणजेच ०.५८ टक्क्यांनी वधारून २५,२९१.१० अंकांवर स्थिरावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande