
रायगड, १७ नोव्हेंबर (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत मित्रपक्षांच्या नेत्यांना सूचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. “गेल्या दोन वर्षांत मी महायुतीतील एकाही नेत्याविरोधात एक शब्दही बोललो नाही. मग असा मी काय गुन्हा केला, माझे कळेना मला,” अशा शब्दांत त्यांनी मनातील खंत व्यक्त केली.
महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवायच्या आणि सत्तेत आल्यानंतर एकमेकांवर टीका करायची, ही भूमिका योग्य नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. दापोलीतील रामदास कदम आणि महाडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना, “मी अभिमन्यू झालो असेल, तर चक्रव्यूह कसा भेदायचा याचा विचार करेन,” असे सूचक विधान त्यांनी केले. भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम आपणच त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सोबत घेतल्याच्या आरोपांवरही तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले.
हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर अधिकृतपणे घेण्यात आला होता. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय झाला होता. भाजपच्या नेत्यांनाही याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे हा विषय वरिष्ठ पातळीवर चर्चेतून सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही तटकरे यांनी पूर्णविराम दिला. “अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीला विलीनीकरण झाले असते; मात्र आता हा विषय पूर्णपणे संपला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. आपण आजही एनडीए आणि महायुतीसोबत ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
विकासकामांच्या आढावा बैठकीत महत्त्वाच्या सूचना
पत्रकार परिषदेपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत रायगड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील पाच पुलांची कामे ३५ ते ४० टक्के पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकल्पासाठी कांदळवन विभागाच्या आवश्यक परवानग्या तातडीने मिळविण्याच्या सूचना तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अलिबाग-वडखळ रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने या कामाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहा येथे टाटा समूहाच्या १२० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या ट्रिपल आयटी प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय महिला बचत गटांना विविध शासकीय योजनांमधून अनुदानाचा लाभ मिळवून देणे, तरुणांना जहाजबांधणी उद्योगासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देणे आणि हरिहरेश्वर (मारळ) येथील धरण व जलसंधारणाच्या कामांना गती देण्यावर भर देण्यात आला.
“पांडुरंगा त्यांचे भलं कर!”
महायुतीतील टीकाकारांना प्रत्युत्तर देताना तटकरे यांनी आणखी एक मार्मिक टोला लगावला. “काल मी म्हणालो होतो ईश्वर त्यांना माफ करो, आज म्हणतो पांडुरंगा त्यांचे भलं कर,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानांमुळे रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, मित्रपक्षांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)