
नागपुरातील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दोन प्रीमियम सूट बुक करण्याची मागणी संशय आल्याने फसवणुकीचा डाव उघड, नंदनवन पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे स्वीय सहायक (पीए) असल्याचे भासवून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल गांधी यांचे नाव सांगून नागपुरातील पंचतारांकित रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दोन प्रीमियम सूट बुक करण्याची मागणी फोनद्वारे करण्यात आली. मात्र, फोनवरील संभाषणावरून संशय आल्याने लोंढे यांनी स्वतः खातरजमा केली आणि फसवणुकीचा प्रयत्न उघडकीस आणला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेशनगर येथील रहिवासी असलेले अतुल लोंढे यांना ८ ते १७ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीच्या काळात रात्री साडेनऊच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण राहुल गांधी यांचे स्वीय सहायक अलंकार सवाई बोलत असल्याचे सांगितले. कामानिमित्त नागपुरात येणार असल्याचे सांगत त्याने वर्धा रोडवरील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दोन प्रीमियम सूट आरक्षित करून देण्याची विनंती लोंढे यांना केली.
राहुल गांधी यांच्या नावाचा संदर्भ असल्याने सुरुवातीला या फोनकडे लोंढे यांनी लक्ष दिले. मात्र, फोनवरील व्यक्तीचा आवाज आणि बोलण्याची पद्धत ओळखीच्या व्यक्तीपेक्षा वेगळी वाटल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीची स्वतःच्या स्तरावर खातरजमा केली. चौकशीअंती फोन करणारी व्यक्ती राहुल गांधी यांचा पीए नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे लोंढे यांच्या लक्षात आले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत अतुल लोंढे यांनी वकील अमित झोटिंग यांच्यामार्फत पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फोन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
राजकीय नेत्यांची नावे आणि त्यांच्या पदांचा गैरवापर करून पक्षातील पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा हा प्रकार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही व्यक्त होण्याची शक्यता आहे.--------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी