
तीन कॉल सेंटरच्या माध्यमातून आठ राज्यांतील सरपंच, ग्रामसेवकांना लक्ष्य विदर्भातील ७२ ग्रामपंचायतींशी संबंधित व्यक्तींकडून ४.५९ लाखांची वसुली
नागपूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : ‘श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली जाहिरातीसाठी पैशांची मागणी करून, ग्रामपंचायतींमधील कथित गैरव्यवहार उघड करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्य टोळीचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) केला जाणार आहे. या टोळीने तीन कॉल सेंटरच्या माध्यमातून देशातील 8 राज्यांतील सरपंच आणि ग्रामसेवकांना लक्ष्य केल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या आदेशानुसार १८ नोव्हेंबर रोजी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक शशांत एन. एम. हे या पथकाचे अध्यक्ष असतील. नरखेड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी मंगला मोकासे यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक धवल देशमुख सहायक तपास अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी मध्य प्रदेशातून चार महिला आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, आरोपींशी संबंधित बँक खाती गोठविण्यात आली असून, या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे.
आतापर्यंतच्या तपासात विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील ७२ ग्रामपंचायतींशी संबंधित व्यक्तींकडून या टोळीने एकूण ४ लाख ५९ हजार ४०० रुपये उकळल्याचे समोर आले आहे.
जाहिरातीच्या नावाखाली आर्थिक मागणी करणे आणि पैसे न दिल्यास ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रसिद्ध करण्याची धमकी देणे, अशा पद्धतीने आरोपींकडून संबंधितांना लक्ष्य केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आता एसआयटीकडून या टोळीचे अन्य राज्यांतील पीडित, संभाव्य साथीदार, आर्थिक व्यवहार आणि तीनही कॉल सेंटरचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी तपास केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती जणांची फसवणूक झाली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हे तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी