
वॉशिंग्टन, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (एपेक) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनमध्ये दाखल झाले. चीनच्या शेनझेन विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते. त्यांनी ट्रम्प यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी विमानतळावर रेड कार्पेट अंथरण्यात आले होते.
विशेष म्हणजे, शी जिनपिंग पहिल्यांदाच एखाद्या परदेशी नेत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते. सहसा अशा स्वागताची जबाबदारी इतर अधिकारी पार पाडतात.ट्रम्प चीनमध्ये एपेक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांची शी जिनपिंग यांच्यासोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकही होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, आयात शुल्क, चीनकडून अमेरिकी कृषी उत्पादनांची खरेदी आणि दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दौरा त्यांच्या आशिया दौऱ्याचा भाग आहे. यापूर्वी ते फिलिपिन्समध्ये दाखल झाले होते. तेथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर आणि अन्य नेत्यांशी चर्चा केली होती. आता चीनमध्ये त्यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेट होणार आहे.ट्रम्प यांची शी जिनपिंग आणि पुतिन यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठकही होणार आहे. ट्रम्प यांनी अण्वस्त्रांवर मर्यादा घालणे आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्याबाबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांनी यापूर्वी पत्रकारांना सांगितले होते की, त्रिपक्षीय बैठकीत युक्रेन संघर्षाचा मुद्दा चर्चेला येणार नाही.
यापूर्वी मंगळवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, दर महिन्याला हजारो रशियन सैनिकांचा मृत्यू होत असल्याने हा संघर्ष संपवण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यांनी संभाव्य कराराबाबत आशावाद व्यक्त केला.ट्रम्प म्हणाले, मला वाटते, आपण हा करार पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहोत. आमची याबाबत चांगली बैठक होणार आहे.ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत स्वतंत्र बैठक तसेच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासोबत वेगळी बैठक होण्याची शक्यताही व्यक्त केली. मात्र, यापैकी कोणत्याही बैठकीला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode