नेतान्याहू यांना मोठा धक्का; इस्रायलच्या संसदेत विरोधी गटाचे मातन काहाना नवे सभापती
जेरुसलेम, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।इस्रायलच्या संसद नेसेटने गादी आयझेनकोट यांच्या मध्य-उजव्या यशार पक्षाचे सदस्य मातन काहाना यांची नवे सभापती म्हणून निवड केली आहे. या घडामोडीला काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी मोठा धक्का मानले जात आ
नेतान्याहू यांना मोठा धक्का; इस्रायलच्या संसदेत विरोधी गटाचे मतान काहाना नवे सभापती


जेरुसलेम, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।इस्रायलच्या संसद नेसेटने गादी आयझेनकोट यांच्या मध्य-उजव्या यशार पक्षाचे सदस्य मातन काहाना यांची नवे सभापती म्हणून निवड केली आहे. या घडामोडीला काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी मोठा धक्का मानले जात आहे. विरोधी पक्ष संसदेत आपली पकड मजबूत करण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत.

नेसेटच्या प्रवक्त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री झालेल्या मतदानात मातन काहाना यांना ६६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला ५२ मते मिळाली. काहाना यांनी नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाचे सदस्य अमीर ओहाना यांची जागा घेतली आहे.२७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशा परिस्थितीत आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाने संसदेचे सभापतीपद मिळवणे हे संसदीय स्तरावरील मोठे यश मानले जात आहे.

सभापतीपद स्वीकारताना काहाना म्हणाले, मी अत्यंत श्रद्धेने इस्रायलच्या संसद नेसेटच्या सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारत आहे. नेसेट हे इस्रायल राज्यातील सर्व नागरिकांचे सभागृह आहे. त्यांचा धर्म, वंश किंवा लिंग कोणतेही असो. या सर्व नागरिकांसाठी सभापती म्हणून काम करण्याचा माझा संकल्प आहे.

आयझेनकोट यांनी या निकालाचे स्वागत करत संसदेच्या नव्या अध्यायाची सुरुवात असल्याचे म्हटले. ते म्हणाले, माझे सहकारी आणि नेसेटचे नवे सभापती होणार असलेल्या मतान काहाना यांचे मी अभिनंदन करतो. एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. मतान यांच्या नेतृत्वाखाली नेसेट पुन्हा एकदा जनतेचे सभागृह बनेल. येथे समाजातील प्रत्येक घटकाचे आणि त्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकले जाईल आणि सर्वांशी समान व्यवहार केला जाईल.

आयझेनकोट यांनी पुढे सांगितले, हा असा अध्याय असेल, जो राजकीय सूजबूज, सन्मानपूर्वक आणि अर्थपूर्ण संवादाने भरलेला असेल. नेसेट एक प्रभावी आणि मजबूत देखरेख संस्था म्हणून आपली भूमिका बजावेल. आजच्या संवेदनशील काळात ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मतान, मला तुझा अभिमान आहे आणि तू यशस्वी होशील, असा मला पूर्ण विश्वास आहे.

दुसरीकडे, काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या निवडीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लिकुड पक्षाने जारी केलेल्या निवेदनात नेतान्याहू यांनी या घटनेला नेसेटच्या इतिहासातील सर्वात खालची पातळी आणि लज्जास्पद घटना म्हटले आहे. आयझेनकोट, बेनेट आणि लिबरमन यांनी राष्ट्रीय एकतेऐवजी राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांच्या आणि दहशतवाद समर्थकांच्या मतांच्या जोरावर एकतर्फी सभापतींची नियुक्ती केल्याचा आरोप त्यांनी केला.ते म्हणाले, इस्रायलची जनता राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांच्या हाती देशाची सत्ता सोपवण्यास विरोध करते. इस्रायलचे लोक एकता इच्छितात. आज आयझेनकोट, बेनेट आणि लिबरमन यांनी राष्ट्रीय एकतेऐवजी दहशतवाद समर्थकांची साथ निवडली आहे. इतिहास हे लक्षात ठेवेल.

इस्रायलच्या १२० सदस्यांच्या एकसदनी संसदेत सभापतीपद अत्यंत प्रभावशाली असते. कारण संसदीय कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करणे आणि विधेयकांना पुढे नेण्याचा अधिकार या पदाकडे असतो. काहाना सभापती झाल्यामुळे आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील गटाला अनेक महत्त्वाचे प्रस्ताव पुढे आणण्यास मदत होऊ शकते. यामध्ये ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी, पंतप्रधानांच्या कार्यकाळावर मर्यादा निश्चित करणे आणि नेतान्याहू यांच्या मागील सरकारने न्यायव्यवस्थेत केलेले बदल रद्द करणे यांचा समावेश आहे.

संसदेच्या सभापतीपदावर वर्चस्व मिळवल्यानंतरही आयझेनकोट यांच्यासमोर नवे सरकार स्थापन करण्याचे मोठे आव्हान कायम आहे. १२० सदस्यांच्या संसदेत आयझेनकोट आणि त्यांच्या सहकारी पक्षांकडे ४८ जागा आहेत, तर नेतान्याहू यांच्या लिकुड आघाडीकडे ५३ जागा आहेत. अशा परिस्थितीत १९ जागा असलेल्या अरब पक्षांची भूमिका सरकार स्थापनेत निर्णायक ठरू शकते.

राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांनी आयझेनकोट यांना पुढील सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत बेंजामिन नेतान्याहू काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील. आघाडी स्थापन करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अपयशी ठरल्यास पुढील वर्षी इस्रायलला पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande