
वॉशिंग्टन, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकी न्यायालयाने हत्या घडवून आणण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी नागरिकाला ३३० महिन्यांच्या (२७ वर्षे आणि ६ महिने) तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.अमेरिकी न्याय विभागाने या पाकिस्तानी नागरिकाला इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या इशाऱ्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक अमेरिकी सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
अमेरिकी न्याय विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या पाकिस्तानी नागरिकाची ओळख आसिफ मर्चंट अशी झाली आहे.इराणच्या आयआरजीसीच्या इशाऱ्यावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह अमेरिकी सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकी संघीय न्यायालयाने त्याला ३३० महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
४८ वर्षीय मर्चंटला ब्रुकलिन येथील संघीय न्यायालयात अमेरिकी जिल्हा न्यायाधीश एरिक आर. कोमिटी यांनी शिक्षा सुनावली. यापूर्वी मार्च २०२६ मध्ये संघीय न्यायमंडळाने त्याला आंतरराष्ट्रीय सीमांपलीकडे दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न आणि पैसे देऊन हत्या घडवून आणण्याचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. तो इराणच्या जागतिक दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआरजीसीचा प्रशिक्षित एजंट असल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिकेचे अटर्नी जनरल टॉड ब्लांश यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येचा कट अंमलात आणण्यासाठी अमेरिकेत आलेल्या इराणी एजंटला त्याच्या गुन्ह्याची योग्य शिक्षा मिळाली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिकी नेत्यांविरोधात रचलेले परकीय दहशतवादी कट न्याय विभाग सहन करणार नाही. या कटांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना न्यायालयासमोर उभे करेपर्यंत कारवाई सुरूच राहील.
प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, मर्चंटने स्वेच्छेने आयआरजीसीमध्ये प्रवेश केला होता आणि त्याला गुप्तचर कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर इराणच्या वतीने अमेरिकी सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्यासाठी मारेकरी शोधणे आणि त्यांना पैसे देणे, या उद्देशाने तो अमेरिकेत आला होता. मर्चंटने ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांचीही संभाव्य लक्ष्य म्हणून नावे घेतली होती. त्यावेळी हे सर्वजण अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार होते.इराणने आपल्या माजी आयआरजीसी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे मानले जात आहे. सुलेमानी यांचा जानेवारी २०२० मध्ये अमेरिकी ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode