अवघ्या १२-१३ वर्षात ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)च्या शताब्दी सोहळ्यात भारताच्या आर्थिक विकासाचा आणि गरिबी कमी झाल्याचा उल्लेख केला. याच्या एक दिवस आधीच विरोधी पक्षनेत
‘अवघ्या १२-१३ वर्षात ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर’- पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)च्या शताब्दी सोहळ्यात भारताच्या आर्थिक विकासाचा आणि गरिबी कमी झाल्याचा उल्लेख केला. याच्या एक दिवस आधीच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देश आर्थिक संकटाच्या विळख्यात असल्याचे म्हटले होते.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असून देशाचा विकासदर सुमारे ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. ते म्हणाले, आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. देशाचा विकासदर सुमारे ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबरमध्ये भारताची वस्तू निर्यात जवळपास ५० अब्ज डॉलरवर पोहोचली. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक वस्तू निर्यात आहे.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून भारताच्या विकासदराच्या अंदाजात सुधारणा केली जात आहे. ते म्हणाले, भारताच्या शानदार कामगिरीमुळे मूडीज रेटिंग्ज, एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज, फिच रेटिंग्ज, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक (एडीबी) यांसारख्या संस्था भारताच्या आर्थिक विकासाच्या अंदाजात वाढ करत आहेत.गेल्या दशकभरात गरिबी कमी झाल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी जागतिक बँकेच्या अहवालाचा दाखला दिला.

ते म्हणाले, जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, अवघ्या १२ ते १३ वर्षांत ५० कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे. १९७० च्या दशकातील धोरणांवर टीका करताना त्यांनी काँग्रेसच्या ‘गरिबी हटाओ’ घोषणेचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, १९७० च्या दशकात जेव्हा गरिबी हटाओचा नारा देण्यात आला, तेव्हा भारताची लोकसंख्या सुमारे ५० कोटी होती. त्यावेळीही गरिबी दूर करता आली असती; मात्र, त्या काळातील धोरणांमध्ये त्रुटी होत्या आणि दुर्दैवाने योग्य हेतूचा अभाव होता, याची फिक्की साक्षीदार आहे.ते पुढे म्हणाले, जेव्हा आम्ही योग्य धोरणे आणि योग्य हेतूने काम केले, तेव्हा अवघ्या १२ ते १३ वर्षांत ५० कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आले.

पंतप्रधानांनी असेही सांगितले की, भारताला यापूर्वी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यामध्ये परवाना-कोटा राजवटीचा काळ तसेच भारताची गणना ‘फ्रॅजाइल फाइव्ह’ (कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या पाच देशांमध्ये) केली जात असलेला काळ यांचा समावेश होता.ते म्हणाले, मात्र, गेल्या १२ वर्षांत देशातील तरुण, शेतकरी, कामगार आणि उद्योगजगतातील नेत्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात बोलताना भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला होता. बेरोजगारी, संघर्ष करत असलेले उत्पादन क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा दाखला देत त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande