पंतप्रधान शुक्रवारी पहिल्या एससीओ नागरी संवाद मंचाचे उद्घाटन करणार
तीन दिवसीय मंचात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि सांस्कृतिक प्रतिनिधी सहभागी होणार नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी सुमारे 5:30 वाजता नवी दिल्लीतील पुराना किल्ला ये
पंतप्रधान मोदी


* तीन दिवसीय मंचात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि सांस्कृतिक प्रतिनिधी सहभागी होणार

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी सुमारे 5:30 वाजता नवी दिल्लीतील पुराना किल्ला येथे पहिल्या एससीओ (शांघाय सहकार्य संघटना) नागरी संवाद मंचाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

20 ते 22 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित या मंचाच्या माध्यमातून या प्रदेशाचा समृद्ध आणि एकमेकांशी जोडलेला नागरी वारसा साजरा केला जाणार आहे. तसेच लोकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करणे आणि विविध संस्कृतींमधील संवाद आणि सहकार्याला चालना देणे, हा या मंचाचा उद्देश आहे.

2025 मध्ये चीनमधील तियानजिन येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधानांनी एससीओच्या माध्यमातून नागरी संवादासाठी स्वतंत्र व्यासपीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याच प्रस्तावाच्या आधारे हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या प्रस्तावाचे एससीओच्या बिश्केक जाहीरनाम्यातही स्वागत करण्यात आले होते.

उद्घाटन समारंभात संगीत, नृत्य, दृकश्राव्य कथन आणि निवेदन यांचा सुरेख संगम असलेला ‘सिव्हिलायझेशन्स इन कॉन्व्हर्सेशन – कल्चरल शो’ (संवादातील संस्कृती – सांस्कृतिक कार्यक्रम) सादर केला जाणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम् – संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम भारत आणि युरेशियामधील सांस्कृतिक संबंध अधोरेखित करणार आहे.

या मंचावर ‘अस्तित्व – द इसेन्स ऑफ अवर एक्झिस्टन्स’ (आपल्या अस्तित्वाचे सार) या शीर्षकाखाली भारताचा पुरातत्त्वीय, कलात्मक आणि साहित्यिक वारसा दर्शवणारी प्रदर्शनेही आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये इ.स.पूर्व 1200 ते इ.स. 1200 या कालखंडातील पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे दिल्लीच्या इतिहासाचा सखोल आढावा मांडला जाईल. त्यात उत्खननात सापडलेले अवशेष, कलाकृती, स्थापत्यकलेचे नमुने आणि इतर महत्त्वपूर्ण शोधांचा समावेश असेल. ‘महाभारत स्क्रोल पॅव्हिलियन – अनंत: अ रेअर 18थ सेंच्युरी महाभारत स्क्रोल’ (18 व्या शतकातील दुर्मिळ महाभारत चित्रपट) या दालनात भारताच्या समृद्ध महाकाव्य परंपरेचे आणि कलावैभवाचे दर्शन घडवणारा सचित्र पट प्रदर्शित केला जाणार आहे.

21 आणि 22 नोव्हेंबर रोजी या मंचावर चार विषयांवर आधारित सत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, विविध विषयांतील तज्ज्ञ आणि सांस्कृतिक प्रतिनिधी सहभागी होतील. या सत्रांमध्ये संगीत आणि सादरीकरण कला, वस्त्रपरंपरा, खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक खेळ यांसारख्या सांस्कृतिक आविष्कारांवर चर्चा होईल. तसेच कला आणि स्थापत्यकलेतील सामायिक परंपरा, लिपी आणि हस्तलिखितांसह भाषा आणि साहित्यपरंपरा, मठ परंपरा आणि तात्त्विक परंपरा या विषयांचाही आढावा घेतला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande