


* स्वच्छता, आरोग्य, शुद्ध पाणी आणि दर्शन रांगेसाठी यंदा विशेष व्यवस्था
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चंद्रभागेच्या तीरावरील पायऱ्यांची स्वच्छता
* चंद्रभागेत फेरफटका मारून सर्व तीरावरील सोयीसुविधांचा पाहणी करून घेतला आढावा
पंढरपूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकार आणि पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आणि निवास व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळासह आधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आधी मोटार सायकलवर स्वार होऊन, तर चंद्रभागेच्या पात्रात बोटीत बसून फेरफटका मारत,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी केलेल्या विविध सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, संपर्क प्रमुख महेश नाना साठे, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस, कार्तिकेयन, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चरणदास चवरे, शिवाजी सावंत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला सर्वंकष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांना प्राधान्य देण्यात आले आहे. वारकऱ्यांना शुद्ध मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यात्रा काळात आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली असून, विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचीही शिंदे यांनी पाहणी केली. भाविकांच्या सुविधांसाठी स्वच्छता कर्मचारी, यंत्रसामग्री आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शौचालये आणि स्नानगृहांची दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आज शिंदे यांनी चंद्रभागेच्या पात्रात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची स्वतः पाहणी करून ती स्वच्छ आहेत अथवा नाहीत हे तपासले. स्वच्छतागृह स्वच्छ असून पुरेशा पाण्याची व्यवस्था असल्याचे पाहून त्यांनी याबाबत आपण समाधानी असल्याचे स्पष्ट केले.
वारकऱ्यांना स्नानासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी ठिक ठिकाणी वॉटर प्युरिफायर यंत्रणा बसवण्यात आली आहे. चंद्रभागा परिसरात चेंजिंग रूम, शौचालये, स्नानगृहे आणि घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. नव्याने विकसित केलेल्या घाटांमुळे भाविकांची गर्दी विभागली जाण्यास मदत होणार आहे. रेल्वे परिसरातील सुमारे ६५ एकर जागेचाही नियोजनासाठी उपयोग करण्यात येत आहे.
दर्शन रांगेत भाविकांना तासन्तास उभे राहावे लागू नये, यासाठी पंखे, कुलर आणि बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यात्रेच्या काळात कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नियोजनादरम्यान काही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चंद्रभागेच्या पायऱ्यांची स्वच्छता
पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेत घेत उपमुख्यमंत्री शिंदे हे चंद्रभागेच्या तीरावर पोहोचले..यावेळी प्रशासनाकडून पायऱ्यांची पाईपद्वारे पाणी मारून स्वच्छता सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हातातील पाईप आपल्या हातात घेऊन पायऱ्यांची स्वच्छता सुरू केली. तसेच यानंतर त्यांनी चंद्रभागेच्या पात्रात बोटीद्वारे फेरफटका मारून आजूबाजूच्या तीरावर वारकऱ्यांसाठी केलेल्या वेगवेगळ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी