
- शनिवार, २१ नोव्हेंबरपासून लागू
कोल्हापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ने दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गायीच्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. ही गोकुळच्या इतिहासातील सर्वांत मोठी दरवाढ असून गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही दरवाढ शनिवार, २१ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.
गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकरी आणि संघाची आर्थिक स्थिती विचारात घेऊन खरेदी आणि विक्री दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध संघाला गेल्या काही मासात ७० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तो भरून काढण्यासाठी ही दरवाढ अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे.
गोकुळच्या दरात शहरानुसार झालेली वाढ
कोल्हापूर - आधीचा म्हशीच्या दुधाचा दर ७२ रूपये लीटर होता. आता तो ७८ रूपये करण्यात आला आहे
कोकण - म्हशीच्या दुधाचा दर ७६ रूपये लीटर होत. आता तो ८२ रूपये लीटर झाला आहे.
पुणे - म्हशीच्या दुधाचा दर ७८ रूपये लीटर होत. आता तो ८४ रूपये लीटर झाला आहे.
मुंबई - म्हशीच्या दुधाचा दर ७८ रूपये लीटर होत. आता तो ८४ रूपये लीटर झाला आहे.
याबाबत बोलताना गोकुळचे चेअरमन राजेश पाटील यांनी सांगितलं की, आमच्या आधी आमचे स्पर्धक मदर डेअरी आणि अमुल यांनी दरवाढ घोषित केली होती. मात्र आम्ही आठ दिवस याबाबत चर्चा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेत ही दूध दरवाढ घोषित केली. मधल्या काळात प्रशासक होता त्यावेळी झालेली तूट भरून काढण्याच्या दृष्टीकोणातून पावले टाकली जात आहेत. आम्ही जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत. कारण राज्यात दुधाची उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावेळी कशी परिस्थिती असेल ते पाहून आम्ही निर्णय घेणार आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी