‘लष्कराने शेजारी देशांविरोधात संघर्ष भडकवणे थांबवावे’; यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानला थेट इशारा
नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर (हिं.स.)।भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला आपल्या कारवायांपासून बाजूला राहण्याचा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत परवथनेनी हरीश यांनी सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला आरस
‘लष्कराने शेजारी देशांविरोधात संघर्ष भडकवणे थांबवावे’; यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानला थेट इशारा


नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर (हिं.स.)।भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला आपल्या कारवायांपासून बाजूला राहण्याचा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत परवथनेनी हरीश यांनी सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला आरसा दाखवत, लष्कराचा हस्तक्षेप देशाला उद्ध्वस्त करत असल्याचे म्हटले. ‘आरिया फॉर्म्युला’ बैठकीत पी. हरीश यांनी भारताची स्पष्ट भूमिका मांडली. गुरुवारी त्यांनी या बैठकीचा व्हिडिओ समाजमाध्यमावरील ‘एक्स’ या मंचावर शेअर केला.

लायबेरियाने आयोजित केलेल्या ‘नैसर्गिक संसाधने आणि संघर्ष’ या विषयावरील बैठकीत भारताने आपली भूमिका मांडली. यात किम्बर्ली प्रक्रियेप्रति भारताचा पाठिंबा, जिल्हास्तरावर खनिज संसाधनांच्या व्यवस्थापनाची यंत्रणा, महिलांची भूमिका आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या भूमिकेवर उपस्थित केलेले प्रश्न यांचा समावेश होता.पाकिस्तानवर टीका करताना पी. हरीश म्हणाले, “या मुद्द्यावर बोलण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र, पाकिस्तानी प्रतिनिधीने हा मुद्दा उपस्थित करून या व्यासपीठाचा वापर अपप्रचारासाठी केल्याने (यापूर्वी पाकिस्तानने सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला होता), या विषयावर भारताची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक वाटते. सिंधू जल कराराबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे आणि विविध व्यासपीठांवर आम्ही ती मांडली आहे.”

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचा उल्लेख करत ते म्हणाले, “गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते परदेशी नेत्यांसमोर खनिज दगडांनी भरलेला लाकडी खोका दाखवताना दिसले होते.” भारतीय राजदूतांनी हा प्रसंग नैसर्गिक संसाधनांच्या शोषणात पाकिस्तानी लष्कराची भूमिका स्पष्ट करणारा असल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले, “देशात लोकशाही शासन असते, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. जनता सुखी राहिली असती आणि त्यांच्या एका प्रांतात चुकीच्या पद्धतीने आणीबाणी लागू करण्यात आली नसती.”भारतीय राजदूत म्हणाले, “पाकिस्तानच्या हिताचेही यातच आहे की, त्यांच्या लष्कराने शेजारील देशांविरोधात संघर्ष भडकवणे थांबवावे. कारण या कारवायांचा विपरीत परिणाम आता पाकिस्तानवरच होत आहे.”

ही टिप्पणी सप्टेंबर २०२५ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती, त्या वेळी समोर आलेल्या छायाचित्राच्या संदर्भात होती. या छायाचित्रात मुनीर खनिज नमुन्यांनी भरलेला लाकडी खोका दाखवताना दिसले होते.संयुक्त राष्ट्रसंघाच्या या बैठकीचा विषय नैसर्गिक संसाधने आणि शांतता यांच्यातील संबंध तसेच या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय नियमांमधील संभाव्य त्रुटींचा आढावा घेणे हा होता. खनिजे आणि अन्य नैसर्गिक संसाधने संघर्षांना कशा प्रकारे चालना देऊ शकतात किंवा शांतता आणि विकासाचा आधार बनू शकतात, यावर बैठकीत चर्चा झाली.

भारताने किम्बर्ली प्रक्रियेप्रति आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. भारत २०२६ मध्ये या प्रक्रियेचा अध्यक्ष आहे. किम्बर्ली प्रक्रिया ही संघर्षांना आर्थिक मदत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिऱ्यांचा अवैध व्यापार रोखण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय प्रमाणन व्यवस्था आहे. ही व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासोबतच जबाबदार हिरे व्यापाराला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व भारताने अधोरेखित केले.

भारतीय राजदूतांनी देशातील जिल्हास्तरावर खनिज संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी असलेल्या यंत्रणांचाही उल्लेख केला. भारतात जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) च्या माध्यमातून खाणकामामुळे प्रभावित झालेल्या भागांचा आणि तेथील रहिवाशांच्या कल्याणासाठी काम केले जाते. खाणकामातून मिळणाऱ्या लाभाचा काही हिस्सा स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचवणे आणि प्रभावित भागांमध्ये विकासकामांना चालना देणे हा या व्यवस्थेचा उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande