
मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.) - शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर टीका करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप केला जातोय. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. यावरुन विरोधकांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला जातोय. दुसरीकडे शायना एनसी यांनी आपण बाळासाहेबांचा फोटो फाडला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांचा अपमान कुणी शिवसैनिक करु शकत नाही आणि करणारही नाही. त्याबाबत शायना एनसी यांनी तात्काळ स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो फोटोही त्यांनी दाखवलेला आहे. बाळासाहेब मणिशंकर अय्यर यांना चप्पल जोडे मारतानाचा फोटो आहे. फाटलेल्या फोटोत मणिशंकर अय्यर यांचं तोंड फाटलं आहे. त्यांनी मला ते दाखवलं. त्यामुळे बाळासाहेबांचा अपमान शायना एनसी असू द्या किंवा कुणीही शिवसैनिक कदापि असू शकणार नाहीत. कारण बाळासाहेब आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय. त्यामुळे जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे.
शिंदे पुढे म्हणाले की, खोटे-नाटे आरोप करुन विरोधक बदनाम करण्याचे काम करत असतील तर महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. फोटोवरुन राजकारण करत आहेत. त्यांच्याकडे राजकारण करण्यासाठी काही नाही. लोकांनी त्यांना जागा दाखवली आहे. यामध्ये काय राजकारण करता. मी पुन्हा सांगतो, बाळासाहेब आमचे दैवत आहेत. त्यांचा आमच्याकडून अवमान होणं हे अशक्य आहे. सावरकरांचा अपमान, सावरकरांना माफीवीर असा उल्लेख त्या पुस्तकात केला गेला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी देखील सावकरकारांचा अपमान वारंवार केला. जाणीवपूर्वक सावकरांचा अपमान करण्याचं पाप राहुल गांधींनी केलं. तसेच सोनिया गांधी यांच्या पुस्तकात देखील सावरकरांचा अपमान करणारी वाक्यं आहेत. दोन पानांवर सावरकरांना माफीवीर म्हटलेलं आहे. त्यामुळे याचा निषेध शिवसेनेने केलेला आहे.
सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पातक पाप जे स्वत:ला सावरकरवादी, हिंदुत्ववादी म्हणून घेतात ते कसं काय सहन करतात? त्याबद्दल कसं काय निषेध करत नाहीत? त्या पुस्तकाचा स्वीकार केला. त्या पुस्तकात सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली आहेत, त्याबद्दल साधा ब्र सुद्धा काढत नाहीत आणि निंदा करत नाहीत. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्याचे जे काम करत नाहीत, त्यांची आम्ही निंदा आणि निषेध करतो. बौद्धिक दिवाळीखोरी कुणाची आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशासाठी जे केलं ते सर्वश्रूत आहे, ती बौद्धिक दिवाळखोरी नाही का? त्यांचा अपमान करणं ही कुठली दिवाळखोरी आहे? ज्या स्वातंत्र्यवीरांनी हाल अपेष्टा भोगल्या त्यांचा अपमान तुम्ही वारंवार केला. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या लोकांना जनतेने तीनवेळा घरी बसवले. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांचे विचार बदलण्याचे काम किंबहुना सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्यासोबत जे केले त्यांची निंदा केली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.
अवमान करण्याचा प्रश्नच येत नाही - शायना एनसी
दरम्यान आपण मुलायमसिंह यादव आणि मणिशंकर अय्यर यांचे फोटो फाडले होते, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडलेला नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून त्यांचे विचार पुढे घेऊन आम्ही चालतो, त्यामुळे त्यांचा अवमान करण्याचा प्रश्नच येत नाही, असंही शायना एनसी यांनी स्पष्ट केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी