
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बुधवारी जपानमधील योकोसुका येथे असलेल्या जपान मेरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ)च्या नौदल तळावर पोहोचले. त्यांच्यासोबत जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमीही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी येथे मोगामी श्रेणीतील बहुउद्देशीय फ्रिगेट युद्धनौका ‘जेएस नातोरी’ला भेट दिली.
राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याबाबत माहिती देताना म्हटले की, भारत आणि जपानमधील वाढते सागरी सहकार्य दोन्ही देशांमधील दृढ विश्वास आणि सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे. हिंद-प्रशांत क्षेत्र स्वतंत्र, खुले आणि नियमाधारित ठेवण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत.राजनाथ सिंह यांनी यापूर्वी अन्य एका पोस्टमध्ये जपानचे त्यांचे समकक्ष यजमानपदाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत असल्याचे म्हटले होते.राजनाथ सिंह यांचा जपानी नौदल तळाचा दौरा अशा वेळी झाला आहे, जेव्हा भारत आणि जपान संरक्षण तसेच सागरी सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देत आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी मोगामी श्रेणीतील बहुउद्देशीय फ्रिगेट युद्धनौका ‘जेएस नातोरी’ची पाहणी केली.
राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर भारत-जपानमधील चौथ्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रिस्तरीय (२+२) बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानची राजधानी टोकियो येथे पोहोचले.टोकियो येथील जपानच्या संरक्षण मंत्रालयात राजनाथ सिंह यांचे जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांना औपचारिक मानवंदनाही देण्यात आली. टोकियो येथे पोहोचल्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे भारतीय राजदूत नगमा मलिक आणि उपमिशन प्रमुख मधुसूदन यांनी स्वागत केले.
या बैठकीत भारताकडून राजनाथ सिंह आणि एस. जयशंकर, तर जपानकडून संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी आणि परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी सहभागी होणार आहेत.या बैठकीत संरक्षण तंत्रज्ञान आणि लष्करी उपकरणांच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी नवीन मार्गांचा शोध घेणे. हिंद-प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि दोन्ही देशांमधील समन्वय वाढवणे.भारत आणि जपानच्या तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त लष्करी सरावांचा विस्तार करणे आणि त्यांची क्षमता वाढवणे.संरक्षण उद्योग क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर विचार करणे या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची २०२६ मध्ये ही तिसरी भेट आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये नवी दिल्ली येथे आणि ऑक्टोबरमध्ये फिलिपिन्समधील सेबू येथे आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौऱ्याचा उद्देश भारत-जपान संरक्षण संबंध अधिक दृढ करणे आणि लष्करी संचालनासह संरक्षण उद्योगातील सहकार्य वाढवण्यासाठी पुढील दिशा निश्चित करणे हा आहे.
जपानला रवाना होण्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी भारत आणि जपानचे संबंध परस्पर विश्वास, लोकशाही मूल्ये आणि हिंद-प्रशांत क्षेत्र स्वतंत्र व खुले ठेवण्याच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित असल्याचे म्हटले होते.दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेणे तसेच तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेच्या क्षेत्रात सहकार्याचे नवे मार्ग शोधणे यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode