
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला भेट
प्रशासकीय नियोजन, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांतील समन्वयावर चर्चा
नाशिक, ०२ नोव्हेंबर (हिं.स.) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पथकाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी सुरू असलेले नियोजन, प्रशासकीय तयारी, नागरी सुविधांची उपलब्धता आणि विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या पथकामध्ये आर्थिक सल्लागार डॉ. अनुराधा गुरु, डॉ. रोझ मेरी के. अब्राहम आणि संचालक कोकिला जयराम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी पथकाचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यानिमित्त प्राधिकरणाच्या कार्यालयात संवादात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी करण्यात येत असलेल्या विविध तयारींची माहिती पथकाला देण्यात आली. देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याचे नियोजन करताना आवश्यक असलेली प्रशासकीय व्यवस्था, विविध विभागांमधील समन्वय, शहराची सज्जता आणि व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.
नाशिकच्या आर्थिक विकासाच्या संधींचाही अभ्यास
भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पथकाचा हा दौरा नाशिकच्या आर्थिक क्षमता आणि विविध क्षेत्रांतील विकासाच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्यापक दौऱ्याचा एक भाग होता. या दौऱ्यादरम्यान कृषी क्षेत्र, प्रगत उत्पादन उद्योग, जीवन विज्ञान तसेच उदयोन्मुख उद्योगांमधील संधींचा अभ्यास करण्यासाठी विविध कृषी आणि औद्योगिक आस्थापनांना भेटी देण्यात आल्या.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून पथकाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनातील नागरी प्रशासनाची भूमिका, मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी आवश्यक असलेले नियोजन आणि विविध यंत्रणांच्या एकत्रित कार्यपद्धतीची माहिती मिळाली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यस्तरीय यंत्रणांमधील समन्वय, प्रशासकीय तयारी आणि नाशिकच्या विकासाच्या संधींच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI