
जळगाव, ०२ नोव्हेंबर (हिं.स.) : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सोने आणि चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या दिशेने असलेल्या मौल्यवान धातूंच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली. सोन्याच्या दरात २०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
जळगाव सराफ बाजारात २ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४२ हजार ३४६ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर झालेल्या या वाढीमुळे सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांना पुन्हा जादा खर्च करावा लागणार आहे.
चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या किमतीत एक हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीचा भाव १ लाख ८८ हजार ४९० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे चांदीचे दागिने आणि वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांचे दरांकडे लक्ष
हिंदू संस्कृतीमध्ये सोने आणि चांदीला विशेष महत्त्व आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत अनेकजण या काळात मौल्यवान धातूंच्या खरेदीला प्राधान्य देतात.
मात्र, गेल्या काही दिवसांतील दरघसरणीनंतर अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात सोन्या-चांदीचे दर आणखी वाढणार की पुन्हा घसरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीपूर्वी सराफ बाजारातील दरांवर ग्राहकांसह व्यावसायिकांचेही लक्ष लागले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर