
गुंतवणूकदारांची संपत्ती ७ लाख कोटींनी वाढली
नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी सहा वर्षांतील सर्वात मोठी तेजी नोंदवल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमती नरमल्याने भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या दिवशी जोरदार मुसंडी मारली. सोमवारी बाजारात सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या कंपन्यांसह मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांमध्येही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाले. बाजारातील या वादळी तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ६.९९ लाख कोटी रुपयांची भर पडली.
सोमवारी व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच बाजारात सकारात्मक वातावरण होते. मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसभर हिरव्या निशाणावर राहिले. दुपारी १२ वाजल्यानंतर काही काळ नफावसुलीमुळे बाजारात घसरण झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा खरेदीचा जोर वाढल्याने दोन्ही निर्देशांकांनी जोरदार उसळी घेतली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१८.७१ अंकांच्या म्हणजेच ०.९७ टक्क्यांच्या वाढीसह ७५,१७८.२४ अंकांवर खुला झाला. सुरुवातीपासूनच खरेदीचा जोर कायम राहिल्याने निर्देशांकाने तेजी पकडली. दुपारनंतर नफावसुलीमुळे सेन्सेक्स काहीसा घसरून ७४,९७८.१२ अंकांपर्यंत खाली आला. मात्र, रिलायन्स आणि धातू क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्सने पुन्हा उसळी घेतली. अखेर १,२३३.२५ अंकांची म्हणजेच १.६६ टक्क्यांची वाढ नोंदवत ७५,६९२.७८ अंकांवर व्यवहाराची समाप्ती केली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १६९.२० अंकांच्या वाढीसह २३,२२२.३० अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या तेजीला दुपारच्या सत्रात काहीसा ब्रेक लागला आणि निफ्टी २३ हजार २०७.०५ अंकांपर्यंत घसरला. मात्र, त्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने निफ्टीने पुन्हा जोरदार मुसंडी मारली. २३ सप्टेंबरनंतर प्रथमच निफ्टीने २३,४०० अंकांची पातळी ओलांडली. अखेर ३८७.७० अंकांच्या म्हणजेच १.६८ टक्क्यांच्या वाढीसह २३,४४०.८० अंकांवर बंद झाला.
क्षेत्रनिहाय व्यवहारात धातू क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली. निफ्टीचा धातू निर्देशांक तीन टक्क्यांहून अधिक वधारला. ऑक्टोबर महिन्यातील वाहन विक्रीची दमदार आकडेवारी समोर आल्याने वाहन क्षेत्रातील समभागांमध्येही खरेदी झाली. वाहन निर्देशांक १.३३ टक्क्यांनी वाढला. सरकारी बँका आणि बांधकाम क्षेत्राच्या निर्देशांकातही एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. दुसरीकडे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक अर्ध्या टक्क्याने घसरला. औषधनिर्माण आणि खासगी बँकांच्या समभागांमध्येही काहीशी घसरण झाली.
मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांमध्येही खरेदीचा उत्साह कायम राहिला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १.१९ टक्क्यांनी, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.७१ टक्क्यांनी वधारला. बाजारातील या तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४७५.३५ लाख कोटी रुपयांवरून वाढून ४८२.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६.९९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
समभागांच्या कामगिरीत रिलायन्स इंडस्ट्रीजने ११.६० टक्क्यांची झेप घेत १,३०० रुपयांवर बंद होत अव्वल स्थान पटकावले. टाटा स्टील ५.८३ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ५.१३ टक्के, कोल इंडिया आणि श्रीराम फायनान्स प्रत्येकी ४.८८ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, इन्फोसिसचे समभाग २.०३ टक्क्यांनी घसरले. आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लाइफ आणि सन फार्मा यांच्या समभागांमध्येही घसरण नोंदवली गेली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule