
नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (एसईसीएल) ने प्रारंभिक सार्वजनिक निर्गमाद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.
सेबीकडे जमा केलेल्या कागदपत्रांनुसार, साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने १ नोव्हेंबर रोजी आपले दस्तऐवज दाखल केले. मसुद्यानुसार, प्रस्तावित आयपीओ पूर्णपणे विक्री प्रस्तावावर (ओएफएस) आधारित असेल. याअंतर्गत कंपनीची प्रवर्तक कंपनी कोल इंडिया ६६.८१ कोटींपर्यंत समभागांची विक्री करणार आहे. या आयपीओमध्ये नवीन समभाग जारी केले जाणार नाहीत.
छत्तीसगडमध्ये स्थित असलेल्या कोल इंडियाची उपकंपनी साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचा हा आयपीओ पूर्णपणे ओएफएसवर आधारित आहे. त्यामुळे या आयपीओतून मिळणारी संपूर्ण रक्कम कोल इंडियाला मिळेल आणि एसईसीएलला कोणतीही रक्कम प्राप्त होणार नाही.
सेबीकडे जमा केलेल्या कागदपत्रांनुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १७.६२ कोटी टन कोळशाचे उत्पादन केले आहे. हे देशातील एकूण कोळसा उत्पादनाच्या १६.९४ टक्के आहे. ही कोल इंडियाची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कोळसा उत्पादक उपकंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कोल इंडियाच्या एकूण उत्पादनात एसईसीएलचा वाटा २२.९५ टक्के होता. उल्लेखनीय म्हणजे, १९८५ मध्ये स्थापन झालेल्या आणि छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मुख्यालय असलेल्या एसईसीएलचा देशातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादक कंपन्यांमध्ये समावेश होतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule