गडचिरोलीत २४० किलो अंमली पदार्थांसह ८ जणांना अटक
आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; १ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी गडचिरोली, २ नोव्हेंबर (हिं. स.) : गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारव
छत्तीसगड मधून अंमली पदार्थाच्या तस्करीत पोलिसांनी अटक केलेले आरोपी


आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; १ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

गडचिरोली, २ नोव्हेंबर (हिं. स.) : गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडमधून अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करून विक्रीच्या तयारीत असलेल्या आठ जणांना पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखा आणि पेंढरी उपविभागांतर्गत गट्टा (फु) पोलीस पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत २४०.५८० किलो अंमली पदार्थांसह एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कठोर निर्देश दिले होते. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पेंढरी उपविभागातील पोलीस मदत केंद्र गट्टा (फु) हद्दीत पोलीस अधिकारी व कर्मचारी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करीत होते.

यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाची (क्र. सीजी २६ के २१४९) तपासणी केली असता, त्यामध्ये असलेले अनिशकुमार पोंदी, हिमांशू नायक आणि परमब परिमलदास (सर्व रा. सुकमा, छत्तीसगड) हे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी आपण पायलटिंग करीत असल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांच्या मागून पिकअप वाहनातून त्यांचे साथीदार शंकर कोसा माडवी, भूपेश धनसुराम कोमरे आणि सुनील रामनाथ मंडावी (सर्व रा. सुकमा, छत्तीसगड) अंमली पदार्थ घेऊन येत असल्याचे तपासात समोर आले. तसेच काही अंतरावर निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी अमोल बळीराम दोरगे आणि विशाल गोवर्धन दोरगे (दोघे रा. पारोडी बोरोडी, ता. आष्टी, जि. बीड) थांबल्याचेही निष्पन्न झाले.

१२ चुंगळ्यांमधून २४० किलो अंमली पदार्थ जप्त

पोलिसांनी सर्व आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १२ चुंगळ्यांमधील २४०.५८० किलो अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी १ नोव्हेंबर २०२६ रोजी उपपोलीस ठाणे पेंढरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील :

अंमली पदार्थ २४०.५८० किलो – १ कोटी २० लाख २९ हजार रुपये.

स्कॉर्पिओ वाहन – १० लाख रुपये.

पिकअप वाहन – ८ लाख रुपये.

दुसरे चारचाकी वाहन – ७ लाख रुपये.

आठ जुने मोबाईल संच – ८१ हजार रुपये.

अशा प्रकारे एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आठही आरोपी पोलीस कोठडी या प्रकरणातील आठही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आंतरराज्यीय टोळीचे आणखी कोणाशी संबंध आहेत का, तसेच अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीच्या साखळीमागे कोणाचा सहभाग आहे, याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करीत आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande