
रत्नागिरी, 02 नोव्हेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर सुरू करण्यात आलेली व्यापक शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. न्यायालयात कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आलेली नाहीत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.संपूर्ण परिसराची कसून तपासणी पूर्ण झाल्याने आता न्यायालयाचे दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारी न्यायालयाच्या अधिकृत मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दुपारी दोन वाजल्यापासून पोलीस दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाच्या (डॉग माध्यमातून न्यायालयाची मुख्य इमारत, आवारातील प्रत्येक कक्ष आणि संपूर्ण परिसराची काटेकोरपणे तपासणी हाती घेण्यात आली. सलग तीन ते चार तास युद्धपातळीवर ही शोधमोहीम राबवण्यात आली. इमारतीचा कानाकोपरा पिंजून काढल्यानंतर कोणतीही आक्षेपार्ह बाब समोर न आल्याने अखेर मोहीम थांबवण्यात आली.
दरम्यान, रत्नागिरीपाठोपाठ राजापूर न्यायालयातही अशाच प्रकारचा ईमेल आल्याने तेथेही पोलिसांचे पथक कसून तपासणी करत आहे, अशी माहिती महामुनी यांनी दिली. नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेण्यात आल्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी