कर्तव्यनिष्ठा : कार्यक्रम पूर्ण केल्यावर योगींनी घेतले आईचे अंत्यदर्शन
सावित्री देवींनी उत्तराखंडच्या पंचूर गावी घेतला अखेरचा श्वास पौडी गढवाल, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवारी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल
आई सावित्री देवींसोबतचे योगी आदित्यनाथ यांचे संग्रहित छायाचित्र


सावित्री देवींनी उत्तराखंडच्या पंचूर गावी घेतला अखेरचा श्वास

पौडी गढवाल, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवारी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पंचूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाची दुःखद बातमी समजल्यानंतरही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील नियोजित कार्यक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी पोहोचले आणि आईच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांनी पंचूर येथील आपल्या मूळ घरी पोहोचले. यावेळी त्यांनी आईच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आईच्या पार्थिवासमोर काही काळ ते स्तब्ध उभे राहिले. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे भावूक चित्र पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी आपल्या 2 दिवसीय गोरखपूर दौऱ्यावर होते. स्थानिक चंपा देवी पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना टॅब्लेटचे वितरण केले. यावेळी विद्यार्थ्यांना यशाचे सूत्र सांगताना त्यांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि आधुनिक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भयमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त उत्तर प्रदेश घडविण्याच्या सरकारच्या संकल्पाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

याच कार्यक्रमादरम्यान त्यांना आई सावित्री देवी यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील एवढ्या मोठ्या दुःखाच्या प्रसंगातही त्यांनी मंचावरील आपले संबोधन सुरू ठेवले. निधनाची माहिती मिळाल्यानंतरही ते एक तासाहून अधिक काळ कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिले. त्यानंतर त्यांनी उत्तराखंडकडे प्रस्थान केले.

वडिलांच्या निधनावेळीही कर्तव्याला दिले होते प्राधान्य

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वैयक्तिक दुःखाच्या प्रसंगीही सार्वजनिक जबाबदारीला प्राधान्य देण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोरोना महामारीच्या काळात त्यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांचे निधन झाले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ लखनऊ येथील पाच कालिदास मार्ग या शासकीय निवासस्थानी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत व्यस्त होते.

वडिलांच्या निधनाची माहिती त्यांना एका चिठ्ठीद्वारे देण्यात आली होती. ही बातमी वाचल्यानंतर त्यांनी ती चिठ्ठी खिशात ठेवली आणि सुरू असलेली बैठक पुढे चालू ठेवली. त्यावेळीही त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

पंचूर गावात गेले योगींचे बालपण

योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तराखंडमध्ये झाला असून त्यांचे बालपण पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या मूळ गावी गेले. संन्यास स्वीकारल्यानंतर आणि गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर झाल्यानंतरही त्यांचे आपल्या गावाशी आणि कुटुंबाशी असलेले नाते कायम राहिले. मे २०२२ मध्ये त्यांनी अनेक वर्षांनंतर पंचूर गावाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी आई सावित्री देवी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.नाथपंथीय संत परंपरेशी संबंधित असलेले योगी आदित्यनाथ यांनी संन्यास स्वीकारल्यानंतर आपले जीवन समाजसेवा आणि लोककल्याणासाठी समर्पित केले. मात्र, आईच्या निधनाच्या प्रसंगी पंचूर येथे पोहोचून त्यांनी घेतलेले अंतिम दर्शन त्यांच्या आयुष्यातील भावनिक आणि कौटुंबिक नात्याची जाणीव करून देणारे ठरले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande