
दिल्लीतील एससीओ बैठकीत पाकिस्तानी मंत्र्यांची नरमाईची भूमिका
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासून कमालीचे तणावपूर्ण बनले असताना पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्याबाबत आशावादी भूमिका मांडली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सभ्यताविषयक संवाद मंचाच्या निमित्ताने भारत दौऱ्यावर आलेल्या मलिक यांच्या वक्तव्यामुळे राजनैतिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीमापार दहशतवादाच्या प्रश्नावर त्यांनी थेट भूमिका मांडणे टाळल्याने त्यांच्या विधानातील सकारात्मकतेवर प्रश्नचिन्हही उपस्थित होत आहे.
नवी दिल्ली येथे शुक्रवारी आयोजित एससीओच्या बैठकीदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मलिक यांना भारत आणि पाकिस्तानमधील संबंध या बैठकीनंतर सुधारतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी केवळ दोन्ही देशांमधीलच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियाई आणि मध्य आशियाई प्रदेशातील देशांचे परस्पर संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या संपूर्ण प्रदेश मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात असून, जागतिक आणि भू-राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. अशा परिस्थितीत परस्पर संवाद आणि सहकार्याला अधिक महत्त्व प्राप्त होत असल्याचे त्यांनी सूचित केले.
दहशतवादाच्या प्रश्नावर मात्र सावध भूमिका
मलिक यांच्या वक्तव्याचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू म्हणजे सीमापार दहशतवादाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर. भारत सातत्याने पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा मुद्दा उपस्थित करत असताना या संवेदनशील प्रश्नावर मलिक यांनी कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिले नाही. उद्या मी माझे अधिकृत निवेदन देईन. त्यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा होईल, असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. त्यामुळे भारताशी संबंध सुधारण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने दहशतवादाच्या मुद्द्यावर नेमकी कोणती भूमिका घ्यायची, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
इतिहास आणि संस्कृतीच्या माध्यमातून संवादाचा आग्रह
भारत-पाकिस्तानमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करताना मलिक यांनी संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. विविधता समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक असतो. एकतेसाठी नव्हे, तर विविधतेचा आदर करण्यासाठी संवादाची गरज असते, असे त्यांनी नमूद केले. भारत, पाकिस्तान, रशिया, चीन आणि मध्य आशियाई देशांमधील प्राचीन ऐतिहासिक संबंधांचा दाखला देताना त्यांनी या प्रदेशातील पुरातत्त्वीय स्थळांचा उल्लेख केला. या स्थळांमधून विविध संस्कृतींमधील परस्पर संबंध, देवाणघेवाण आणि ऐतिहासिक संवादाचे पुरावे मिळतात, असेही त्यांनी सांगितले.
सिंधू जल करारावरून आक्रमक भूमिका, आता संबंध सुधारण्याची भाषा
मलिक यांच्या ताज्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त होण्यामागे सिंधू जल कराराचा मुद्दाही आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० च्या सिंधू जल कराराला स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी यापूर्वी भारताविरोधात आक्रमक वक्तव्ये केली होती. जून महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानच्या पाण्याच्या हक्काला हात लावणाऱ्यांचे हात तोडण्याची भाषा त्यांनी केली होती. त्यामुळे आता भारताच्या भूमीवर येऊन द्विपक्षीय संबंध सुधारण्याची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या मलिक यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
तीन वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्र्याचा भारत दौरा
मलिक यांचा भारत दौरा राजनैतिकदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. मे २०२३ मध्ये तत्कालीन पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी गोवा येथे झालेल्या एससीओ बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यानंतर पाकिस्तानी संघीय मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा आहे. विशेष म्हणजे, मे २०२५ मधील भारत-पाकिस्तान लष्करी संघर्ष आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा ठरला आहे.
नवी दिल्लीतील पुराना किल्ला येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या SCO सभ्यताविषयक संवाद मंचात विविध सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या मंचाचा मुख्य उद्देश सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक संबंध आणि विविध सभ्यतांमधील संवादाला प्रोत्साहन देणे हा आहे. त्यामुळे हा दौरा द्विपक्षीय चर्चेचा औपचारिक प्रयत्न नसून बहुपक्षीय व्यासपीठावरील सहभागाचा भाग आहे.
संबंध सुधारणार की केवळ राजनैतिक औपचारिकता ?
एकीकडे भारताशी संबंध सुधारण्याची अपेक्षा व्यक्त करायची आणि दुसरीकडे सीमापार दहशतवादाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळायचे, ही पाकिस्तानची भूमिका कितपत विश्वासार्ह ठरणार, याकडे आता लक्ष लागले आहे. भारतासाठी पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये दहशतवाद हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे केवळ सांस्कृतिक संबंध, ऐतिहासिक वारसा आणि संवादाच्या गोड भाषणांमुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा होणे शक्य नाही. पाकिस्तान आपल्या भूमिकेत प्रत्यक्ष बदल करतो का, दहशतवादाला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलतो का आणि परस्पर विश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतो का, यावरच भविष्यातील संबंधांची दिशा अवलंबून असेल.-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी