
- नियमावलीचे उल्लंघन केल्यास ५ लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई
- दिशाभूल करणारी जाहिरात किंवा परवान्याविना व्यवसाय केल्यास थेट १० लाखांपर्यंत दंड
- व्यक्तीचा मृत्यू झाल्यास थेट जन्मठेपेची शिक्षा
मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) - बनावट हेल्थ सप्लिमेंट्स आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहाराबाबत कडक नियमावली लागू केल्याची मोठी घोषणा केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठोर कायदेशीर आणि आर्थिक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंढे यांनी दिला आहे. या नवीन नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर दंड आणि शिक्षेची तरतूद केली आहे. यानुसार, नियमावलीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर ५ लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास किंवा एफडीएच्या परवान्याविना व्यवसाय केल्यास थेट १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सप्लिमेंट्सच्या सेवनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधितांना थेट जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
प्रोटीन पावडर, मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या, वजन घटवणाऱ्या गोळ्या, क्रीडा पूरक आहार आणि हर्बल प्रोडक्ट्सची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र, या उत्पादनांमध्ये प्रत्यक्षात वेगळाच घटक असतो आणि ग्राहकांची फसवणूक करत त्यांची विक्री भलत्याच नावाने केली जात आहे. या संदर्भातील अनेक गंभीर प्रकार 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईत निदर्शनास आले आहेत. या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेली नवीन नियमावली फक्त उत्पादकांपुरती मर्यादित नसून संपूर्ण साखळीला लागू करण्यात आली आहे. यामध्ये उत्पादक, पुरवठादार, वितरक, आयातदार, औषधालये, तसेच जिम आणि हेल्थ सेंटर्सचा समावेश आहे. या सर्वांकडे एफडीएचा अधिकृत परवाना असणे आता कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय सध्या सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएंसर्सकडून प्रोटीन पावडर, झटपट वजन घटवणे किंवा चेहऱ्यावर ग्लो येतो असे खोटे व अतिशयोक्तीपूर्ण दावे करून जाहिराती केल्या जात आहेत. या जाहिरातींना भुलून लहान बालके, गर्भवती माता, रुग्ण आणि खेळाडू कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याविना हे पदार्थ 'औषध' समजून सेवन करत आहेत, जे त्यांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे आता सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही एफडीएची बारकाईने नजर राहणार असून, संबंधित इन्फ्लुएंसर्सवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांना सतर्क करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, हेल्थ सप्लिमेंट्स हे केवळ दैनंदिन आहाराला पूरक असतात; त्यांच्या सेवनाने कोणताही आजार बरा होत नाही. त्यामुळे त्यांना औषध समजण्याची चूक करू नये. तसेच, उत्पादनांमध्ये प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक किंवा इतर विशेष घटकांच्या वापरासाठी एफडीएची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये. तसेच, कुठेही अशा प्रकारचे नियमबाह्य कृत्य किंवा बनावट सप्लिमेंट्सची विक्री आढळल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.
ही नियमावली उत्पादक, पुरवठादार, वितरक, आयातदार, केमिस्ट, जिम आणि हेल्थ सेंटर्स या सर्वांना लागू असेल. या सर्वांकडे एफडीएचा परवाना असणे बंधनकारक आहे.
गुन्ह्याचे स्वरूप आणि शिक्षा / दंडाची तरतूद
नियमावलीचे उल्लंघन केल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड
दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड
परवान्याविना व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड
सप्लिमेंट्सच्या सेवनाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास थेट जन्मठेपेची शिक्षा
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी