लातूर - मटका जुगार व अवैध वाळू चोरीप्रकरणी दोन इसमांवर तडीपारीची कारवाई
लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी तसेच वारंवार बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने लातूर पोलीस दलाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. याच अ
पोलीस कारवाई


लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी तसेच वारंवार बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने लातूर पोलीस दलाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. याच अनुषंगाने औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार चालविणे व नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू चोरी करणे अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या दोन इसमांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

औराद शहाजानी पोलिसांनी सादर केलेल्या तडीपारीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, निलंगा मा. श्री. झाडके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 56 अन्वये किसन पिराजी कांबळे व साबेर खाजसाब करखेले या दोन्ही इसमांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लातूर व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश दिनांक 13 नोव्हेंबर 2026 रोजी पारित केले आहेत.

मटका जुगार चालविणाऱ्या किसन कांबळेवर तडीपारीची कारवाई

किसन पिराजी कांबळे याच्याविरुद्ध औराद शहाजानी पोलीस ठाण्यात मटका जुगारासंदर्भात वारंवार गुन्हे दाखल आहेत. मटका जुगारासारख्या अवैध व्यवसायात त्याचा सातत्याने सहभाग असल्याची पोलीस अभिलेखात नोंद आहे. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी कायदेशीर कारवाई करूनही त्याच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसत नसल्याने औराद शहाजानी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

अवैध वाळू चोरी करणाऱ्या साबेर करखेलेवर कारवाई

साबेर खाजसाब करखेले याच्याविरुद्ध नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू चोरी केल्याप्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात वारंवार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासनाच्या मालकीच्या नैसर्गिक संपत्तीचे अवैध उत्खनन व चोरी यांसारख्या कृत्यांमुळे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होत असल्याने त्याच्या बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी त्याच्याविरुद्धही तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

दोन्ही इसमांविरुद्ध दाखल असलेले गुन्हे, त्यांची बेकायदेशीर कृत्ये तसेच पोलीस प्रशासनाने सादर केलेल्या तडीपारीच्या प्रस्तावातील बाबींचा विचार करून उपविभागीय अधिकारी, निलंगा मा. श्री. झाडके यांनी दोन्ही इसमांना सहा महिन्यांसाठी लातूर व धाराशिव जिल्ह्यांच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूर जिल्ह्यात मटका जुगार, अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी तसेच इतर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सातत्याने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारीसारख्या प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande