सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कारवाई; ५० ग्रॅम सोन्याच्या चोरीचा गुन्हा उघड
सोलापूर, २० नोव्हेंबर (हिं.स.) : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी ओळख वाढवून प्रसादाच्या नावाखाली गुंगीकारक पदार्थ मिसळलेली चिक्की खाऊ घालत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. एका दाम्पत्याला गुंगी आणून त्यांच
सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कारवाई; ५० ग्रॅम सोन्याच्या चोरीचा गुन्हा उघड


सोलापूर, २० नोव्हेंबर (हिं.स.) : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी ओळख वाढवून प्रसादाच्या नावाखाली गुंगीकारक पदार्थ मिसळलेली चिक्की खाऊ घालत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. एका दाम्पत्याला गुंगी आणून त्यांच्याकडील तब्बल ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याचा प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला होता. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

गीतादेवी ऊर्फ मीनादेवी रामनरेश थोर (वय ५७, रा. इटावा, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील रहिवासी गोविंद व्यंकटेश कुमार हे १५ सप्टेंबर २०२६ रोजी कोपरगाव ते मंत्रालय असा रेल्वे प्रवास करत होते. यावेळी आरोपी महिलेने त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दाम्पत्याशी ओळख वाढवली. काही वेळाने तिने प्रसाद असल्याचे सांगून गुंगीकारक औषध मिसळलेली चिक्की दोघांना खाण्यास दिली.

चिक्की खाल्ल्यानंतर दाम्पत्याला गुंगी आली. याच संधीचा फायदा घेत आरोपी महिलेने त्यांच्या जवळील सुमारे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी गोविंद कुमार यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रेल्वेतील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी महिलेचा शोध सुरू केला. अखेर तपासादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथून संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडून सुरू आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande