
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर धक्का देणारी बातमी समोर आली आहे. देशाच्या परकीय चलनसाठ्यात पुन्हा घसरण नोंदवण्यात आली आहे. १३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा १४.२० अब्ज डॉलरने घटून ७०५.३४ अब्ज डॉलरवर आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने शुक्रवारी ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यापूर्वीच्या आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलनसाठा २.४९ अब्ज डॉलरने वाढून ७१९.५५ अब्ज डॉलरच्या स्तरावर पोहोचला होता.
आकडेवारीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्याचा प्रमुख घटक मानल्या जाणाऱ्या परकीय चलन मालमत्तेतही ७.९ अब्ज डॉलरची घट होऊन ती ५८३.४५ अब्ज डॉलरवर आली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सुवर्णसाठ्याचे मूल्य ६.१८ अब्ज डॉलरने घटून ९८.६१ अब्ज डॉलर झाले आहे.
केंद्रीय बँकेच्या माहितीनुसार, विशेष आहरण अधिकार (एसडीआर) ९.२ कोटी डॉलरने घटून १८.५२ अब्ज डॉलरवर आले आहेत. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मधील देशाचा राखीव साठाही ३.२ कोटी डॉलरने घटून ४.७६ अब्ज डॉलरवर राहिला आहे. उल्लेखनीय म्हणजे, ४ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा ७८५.७१ अब्ज डॉलर या आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule