जुन्या समजुतींमध्ये अडकून न राहता, भारताकडे नव्या दृष्टिकोनातून पाहा- एस. जयशंकर
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर (हिं.स.)। परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी टोकियो दौऱ्यादरम्यान जपानी कंपन्यांना भारताबद्दलची आपली धारणा बदलण्याचे आणि जुन्या प्रतिमेत अडकून न राहण्याचे आवाहन केले. भारतातील आर्थिक परिवर्तन आणि जागतिक स्तरावर वाढणारा सहभा
जुन्या समजुतींमध्ये अडकून न राहता, भारताकडे नव्या दृष्टिकोनातून पाहा- एस. जयशंकर


नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर (हिं.स.)। परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी टोकियो दौऱ्यादरम्यान जपानी कंपन्यांना भारताबद्दलची आपली धारणा बदलण्याचे आणि जुन्या प्रतिमेत अडकून न राहण्याचे आवाहन केले. भारतातील आर्थिक परिवर्तन आणि जागतिक स्तरावर वाढणारा सहभाग अधोरेखित करताना, देशात व्यवसाय करणे पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपे आणि कार्यक्षम झाले असल्याचे त्यांनी सांगितले. टोकियो येथे आयोजित ‘रायसीना-टोकियो २०२६’ परिषदेला संबोधित करताना जयशंकर यांनी हे वक्तव्य केले.

जयशंकर म्हणाले, “कृपया भारतात होत असलेले बदल समजून घ्या. विशेषतः २०१४ नंतर भारतात मोठे परिवर्तन झाले आहे. या बदलांमुळे देशात व्यवसाय करणे अधिक सोपे आणि कार्यक्षम झाले आहे. हे परिवर्तन विशेषतः पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात दिसून येते. महामार्ग, बंदरे, विमानतळ, रेल्वे आणि वीज या क्षेत्रांत मोठी प्रगती झाली आहे.भारताकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. जुन्या समजुतींमध्ये अडकून राहू नका.”जयशंकर हे १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान जपानच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्यासोबत चौथ्या भारत-जपान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय चर्चेत (२+२) सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.त्यांनी तिसऱ्या रायसीना-टोकियो परिषदेलाही संबोधित केले. यावेळी भारतातील आर्थिक परिवर्तन, जागतिक स्तरावर वाढता सहभाग आणि भारत-जपान यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या व्यापक संधींवर त्यांनी प्रकाश टाकला.

२+२ चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी स्वतंत्र, मुक्त आणि नियमाधारित हिंद-प्रशांत क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्याची बांधिलकी पुन्हा व्यक्त केली. तसेच संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. संरक्षण सराव, संरक्षण उद्योग, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावरही सहमती दर्शवली. जपानच्या स्वसंरक्षण दलांना भारतातील गोळीबार सराव क्षेत्राचा वापर करण्यासंदर्भातील सामंजस्याच्या पत्रावर स्वाक्षरी झाल्याचे मंत्र्यांनी स्वागत केले. याशिवाय, धोरणात्मक क्षेत्रांमध्ये प्रकल्पाधारित आर्थिक सुरक्षा सहकार्य पुढे नेण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.दोन्ही देशांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध आणि स्वरूपांविरुद्ध लढण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. या बैठकीनंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले.

जयशंकर यांनी जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी यांच्यासोबत १९ वी परराष्ट्र मंत्र्यांची धोरणात्मक चर्चा देखील केली. या चर्चेत आर्थिक सुरक्षा आणि मजबूत पुरवठा साखळ्यांचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, महत्त्वपूर्ण खनिजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, दूरसंचार आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा करण्यात आली. मंत्र्यांनी आर्थिक आणि व्यापारी सहकार्याच्या प्रगतीचाही आढावा घेतला. यामध्ये भारतात जपानी गुंतवणूक वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा समावेश होता. तसेच लोकांची ये-जा, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि परस्पर हिताच्या अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande