दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तौहिद हृदोय दोषी
दुबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। बांगलादेशचा फलंदाज तौहिद हृदोय याला जोहान्सबर्ग येथील वांडरर्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेच्या स्तर-१ चे उल्लंघन केल्
Sports Cricket Towhid ICC Code of Conduct


दुबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। बांगलादेशचा फलंदाज तौहिद हृदोय याला जोहान्सबर्ग येथील वांडरर्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेच्या स्तर-१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

या उल्लंघनाबद्दल हृदोय याला सामन्याच्या मानधनाच्या ४० टक्के दंड ठोठावण्यात आला असून, त्याच्या खात्यात दोन अवगुण गुणांचीही भर पडली आहे. त्याने आयसीसीच्या खेळाडू आणि खेळाडू सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेतील कलम २.८ चे उल्लंघन केले आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर असहमती दर्शवण्याशी संबंधित आहे.

ही घटना बुधवारी घडली. खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर मैदानावरील पंच अहसान रझा आणि अॅलेक्स व्हार्फ हे बांगलादेश संघाच्या ड्रेसिंग रूमच्या सज्जाजवळून जात होते. त्यावेळी बांगलादेशी फलंदाजाने खराब प्रकाश असतानाही खेळ आधी न थांबवण्याच्या पंचांच्या निर्णयावर टीका केली. आयसीसीच्या माहितीनुसार, पंचांशी बोलताना त्याची वागणूक आक्रमक आणि अनुचित होती. हृदोय याने आपला गुन्हा मान्य केला असून, आयसीसीच्या मान्यवर पंचांच्या पॅनेलमधील सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सुचवलेली शिक्षाही स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता भासली नाही.

हृदोय याच्याविरोधातील आरोप मैदानावरील पंच अहसान रझा आणि अॅलेक्स व्हार्फ, तिसरे पंच आसिफ याकूब तसेच चौथे पंच लुबाबालो गकुमा यांनी ठेवले होते. गेल्या २४ महिन्यांच्या कालावधीत हृदोय याच्याकडून झालेला हा पहिलाच नियमभंग आहे. आचारसंहितेच्या स्तर-१ च्या उल्लंघनासाठी खेळाडूला किमान अधिकृत ताकीद दिली जाऊ शकते. तर कमाल शिक्षा म्हणून सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन अवगुण गुण दिले जाऊ शकतात.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी दुसऱ्या डावात केवळ एक गडी गमावून १२ धावांचे किरकोळ लक्ष्य पूर्ण करत कसोटी सामना जिंकला. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात १५७ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावातही संघर्ष करताना दिसला आणि अवघ्या १६८ धावांवर त्यांचा डाव आटोपला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सलामीवीर मार्क्स एकरमन याची पहिल्याच षटकात विकेट गमावली. मात्र, दुसऱ्याच षटकात त्यांनी विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण केल्या. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही पहिल्या स्थानावर पोहोचला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande