
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांची दिल्ली कॅपिटल्सने आपल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) संघाच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली आहे. आगामी २०२७ च्या हंगामापूर्वी फ्रँचायझीने शुक्रवारी ही घोषणा केली. जेएसडब्ल्यू आणि जीएमआर यांच्या संयुक्त मालकीच्या दिल्ली कॅपिटल्सने जयवर्धने यांच्याकडे संघाच्या क्रिकेटविषयक सर्व जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
नवीन भूमिकेत जयवर्धने संघाची रणनीती तयार करणे, प्रतिभावान खेळाडूंची निवड करणे तसेच खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या विकासाची जबाबदारी सांभाळतील. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा फायदा महिला संघाला पुढील स्तरावर पोहोचण्यासाठी होईल, अशी फ्रँचायझीला अपेक्षा आहे.
आपल्या पिढीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फलंदाजांमध्ये समावेश असलेल्या जयवर्धने यांनी श्रीलंकेसाठी १४९ कसोटी आणि ४४८ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ११,८१४, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२,६५० धावा केल्या आहेत. त्यांनी श्रीलंकेच्या संघाचे कर्णधारपदही भूषवले असून, २०१४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे ते सदस्य होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि फ्रँचायझी क्रिकेटमधील यशस्वी रणनीतीकारांमध्ये स्थान मिळवले.
दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक आणि जीएमआर स्पोर्ट्सचे अध्यक्ष किरण कुमार ग्रांधी यांनी या नियुक्तीबाबत सांगितले की, दिल्ली कॅपिटल्स महिला प्रीमियर लीगच्या सुरुवातीपासूनच या प्रवासात आघाडीवर राहिली आहे. मैदानाच्या आत आणि बाहेरही उच्च दर्जाचे मानदंड निर्माण करणारा संघ तयार करणे हे फ्रँचायझीचे उद्दिष्ट राहिले आहे. महिला क्रिकेटचा सातत्याने वाढणारा स्तर लक्षात घेता संघाची क्रिकेटविषयक रणनीती अधिक मजबूत करण्याची गरज आहे. यापूर्वी तयार केलेल्या भक्कम पायावर पुढे वाटचाल करत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ते म्हणाले की, महेला यांच्या नियुक्तीमुळे महिला संघाला अनुभव आणि रणनीतिक नेतृत्वाची नवी दिशा मिळेल. आधुनिक क्रिकेटची त्यांना असलेली जाण आणि स्पर्धात्मक संघ तयार करण्याचा अनुभव दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाला पुढील स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांना संघासोबत काम करताना पाहण्यासाठी फ्रँचायझी उत्सुक आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष आणि सहमालक तसेच जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे संस्थापक पार्थ जिंदाल म्हणाले की, महेला हे क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम रणनीतीकारांपैकी एक आहेत. खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी केलेली कामगिरीच त्यांची क्षमता स्पष्ट करते. महेला यांचे दिल्ली कॅपिटल्स परिवारात स्वागत करताना फ्रँचायझीला अतिशय आनंद होत असून, त्यांच्या अनुभवाचा आणि दृष्टिकोनाचा संघाला निश्चितच फायदा होईल.
दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील गुप्ता म्हणाले की, जागतिक दर्जाचा महिला क्रिकेट संघ तयार करणे आणि फ्रँचायझीमध्ये उत्कृष्टतेची कायमस्वरूपी संस्कृती विकसित करणे या दिशेने महेला यांची नियुक्ती हे महत्त्वाचे पाऊल आहे. विजेते संघ तयार करण्याचा त्यांचा अनुभव, खेळाची सखोल समज आणि प्रतिभावान खेळाडूंना घडवण्याची क्षमता यामुळे ते संघाच्या नेतृत्व गटाचा महत्त्वाचा भाग ठरतील. महेला यांचे विचार, अनुभव आणि नेतृत्व डब्ल्यूपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या पुढील वाटचालीला दिशा देईल आणि संघाला सातत्याने सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यास मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीबाबत महेला जयवर्धने म्हणाले की, दिल्ली कॅपिटल्सची स्वतःची एक मजबूत ओळख असून महिला क्रिकेटच्या भविष्याबाबत त्यांची विचारसरणी उत्कृष्ट आहे. डब्ल्यूपीएल संघाच्या क्रिकेट संचालकपदाची जबाबदारी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेमध्ये महिला क्रिकेटचे भविष्य बदलण्याची प्रचंड क्षमता आहे. प्रतिभावान खेळाडू आणि अनुभवी सहकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.
ते पुढे म्हणाले की, संघातील सध्याच्या चांगल्या बाबी अधिक मजबूत करणे, कामगिरीमध्ये सातत्य आणणे आणि संघाला सातत्याने अधिक चांगले बनवणे यावर माझा भर राहील. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला विजेतेपदासाठी प्रबळ आव्हान उभे करता येईल. संपूर्ण संघाच्या एकत्रित प्रयत्नांतून आगामी काळात शानदार यश मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule