
पुणे, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्यातील गुणवंत ॲथलेटिक्स खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने ‘मिशन लक्षवेध’ उपक्रमांतर्गत निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी २७ व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी महाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील ॲथलेटिक्स ट्रॅकवर होणार आहे. राज्यस्तरीय हायपरफॉर्मन्स सेंटरसाठी खेळाडूंची निवड या चाचणीद्वारे करण्यात येणार आहे.
या निवड प्रक्रियेसाठी खेळाडूंचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडूंनी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता निवड चाचणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. २८ नोव्हेंबर रोजी खेळाडूंची शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच क्रीडा वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, परदेशातील प्रशिक्षणाची संधी, दर्जेदार निवास व भोजन व्यवस्था, पूरक आहार आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी ऑनलाइन नोंदणी अर्ज भरावा. योजनेविषयी अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
निवड चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी प्रशांत यमकर यांच्याशी ९५४५७३२९८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक संजय सबनीस यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु