रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया विरोधात ब्रिटन राबवणार आक्रमक सायबर मोहीम
लंडन, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। ब्रिटनने प्रथमच सार्वजनिकरीत्या मान्य केले आहे की, रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया या देशांविरोधात ब्रिटन आक्रमक सायबर मोहिमा राबवत आहे. ब्रिटनच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, या देशांकडून वाढत्या सायबर
BRITAIN CYBER OPERATION AGAINST RUSSIA CHINA IRAN


लंडन, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। ब्रिटनने प्रथमच सार्वजनिकरीत्या मान्य केले आहे की, रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया या देशांविरोधात ब्रिटन आक्रमक सायबर मोहिमा राबवत आहे. ब्रिटनच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, या देशांकडून वाढत्या सायबर धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनचे नॅशनल सायबर फोर्स सक्रियपणे काम करत आहे. यासोबतच संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि इंटरनेटवरील गुन्हेगारांनाही लक्ष्य केले जात आहे.

तुर्कियेची सरकारी वृत्तसंस्था अनाडोलूच्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या सायबर अँड स्पेशालिस्ट ऑपरेशन्स कमांडचे प्रमुख जनरल रॉब मॅगोवन यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत याला दुजोरा दिला. या वर्षाच्या सुरुवातीला पदभार स्वीकारल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत होती.

मॅगोवन म्हणाले की, आधुनिक युद्धामध्ये सायबर क्षेत्राची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची होत आहे. नॅशनल सायबर फोर्स आक्रमक सायबर मोहिमा राबवते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे होकार देत सांगितले की, ब्रिटनने यासंदर्भात यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जनरल मॅगोवन यांनी रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया या देशांचा उल्लेख करताना सांगितले की, हे देश ब्रिटनची जीवनशैली आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करत आहेत. हे देश सायबर क्षेत्रात सातत्याने मोहिमा राबवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सायबर क्षेत्रात ब्रिटनविरोधात कारवाया करणाऱ्या देशांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. अशा धोक्यांचा सामना करणे आणि विरोधकांना प्रत्युत्तर देणे हे नॅशनल सायबर फोर्सचे काम आहे.

मॅगोवन यांनी सांगितले की, नॅशनल सायबर फोर्सचे काम केवळ परदेशी देशांपुरते मर्यादित नाही. ही फोर्स संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांना हानी पोहोचवणाऱ्या गुन्हेगारांविरोधातही कारवाई करते. विशेषतः लहान मुलांना ऑनलाइन माध्यमातून त्रास देणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कारवाई करणे हादेखील या फोर्सच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रिटनच्या नॅशनल सायबर फोर्सबाबतचा हा खुलासा अशा वेळी झाला आहे, जेव्हा याच आठवड्यात किंग चार्ल्स यांनी लँकाशायरमधील सॅमलेसबरी येथे या फोर्सच्या नवीन मुख्यालयाचे अधिकृत उद्घाटन केले.

या फोर्सच्या बहुतांश मोहिमा गोपनीय ठेवल्या जातात. तिचे बहुतांश काम ब्रिटनमधील केंद्रांमधून चालवले जाते. यामध्ये सॅमलेसबरी येथील रिबल हाऊसचाही समावेश आहे.

मॅगोवन यांच्या म्हणण्यानुसार, विरोधकांच्या नेटवर्कची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या संगणकीय प्रणालींमध्ये स्वतःची उपस्थिती निर्माण करण्यासाठी नॅशनल सायबर फोर्सकडून कॉम्प्युटर नेटवर्क एक्स्प्लॉइटेशन यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या क्षमतेच्या माध्यमातून विरोधकांचे नेटवर्क आणि त्यांची रचना समजून घेऊन सायबर क्षेत्रात प्रभावी कारवाई करणे शक्य होते.

जनरल मॅगोवन यांनी ब्रिटनसमोरील सायबर धोक्यांना अत्यंत गंभीर म्हटले आहे. त्यांच्या मते, देशाच्या आक्रमक सायबर क्षमता नव्याने निर्माण होणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लष्कराला आवश्यक पर्याय उपलब्ध करून देतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande