
लंडन , 20 नोव्हेंबर (हिं.स.)। फ्रान्सच्या नैऋत्य भागातील लँडेस किनाऱ्यावर माल्टाचा ध्वज असलेले मालवाहू जहाज अडकले. त्यानंतर बचाव मोहीम राबवून हेलिकॉप्टरच्या मदतीने जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, जहाजाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तीन कर्मचारी अद्याप जहाजावरच आहेत.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे जोरदार वाऱ्यामुळे दरम्यान ‘मीरो जी’ नावाचे हे जहाज लँडेस किनाऱ्याजवळ अडकले. जहाज सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ते बाहेर काढण्याच्या तयारीत मदत करण्यासाठी तीन कर्मचारी जहाजावरच थांबले आहेत. प्रशासनाकडून आता जहाजाला टोइंग करून किनाऱ्यापासून दूर नेण्याची योजना आखली जात आहे.
अधिकाऱ्यांनी जहाजाच्या मालकाला औपचारिक नोटीस बजावली असून, सध्याच्या आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जहाजातून तेल किंवा अन्य पदार्थांची गळती झाल्यास पर्यावरणाची हानी कमीत कमी व्हावी, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय तयार ठेवण्यास सांगितले आहे.
लंडन स्टॉक एक्स्चेंज समूहाच्या आकडेवारीनुसार, ‘मीरो जी’ या जहाजाला फ्रान्समधील रूएन बंदरावरून लिबियासाठी ३० हजार मेट्रिक टन गहू लोड करायचा होता. सध्या प्रशासनाचे प्राधान्य जहाजाला सुरक्षितपणे किनाऱ्यावरून बाहेर काढणे आणि संभाव्य पर्यावरणीय हानी टाळणे हे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode