
रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं.स.) । जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळामार्फत जिल्हा परिषद महापुरुष चषक या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. येत्या १६ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत रत्नागिरीत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गेली ३० वर्षे कर्मचाऱ्यांसाठी स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा व रक्तदान शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम राबवत आहे. जिल्हा परिषद आवारातील श्री महापुरुष व दत्त मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी संकलनाच्या उद्देशाने नोव्हेंबर २०२३ मध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार यंदा दुसरी स्पर्धा होणार आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडेल.
स्पर्धेतील पहिल्या दोन विजेत्यांना अनुक्रमे ५५,५५५ आणि ३३,३३३ हजार रुपयांची पारितोषिके आणि आकर्षक चषक, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला आकर्षक चषक दिला जाईल. प्रत्येक सामन्यासाठी ‘सामनावीर’, स्पर्धेतील ‘उत्कृष्ट फलंदाज’, ‘उत्कृष्ट गोलंदाज’ आणि ‘मालिकावीर’ यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून चषक अनावरण, लॉट्स व कर्णधार सभा १० डिसेंबर २०२६ होईल. स्पर्धा १६ ते १८ डिसेंबर २०२६ या काळात दररोज सायंकाळी ६.०० ते रात्री ११.०० आणि १९ व २० डिसेंबर २०२६ रोजी दिवस-रात्र सामने होतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील नियमित शासकीय सेवेतील केंद्र व राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, बँका व महामंडळांचे अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होऊ शकतात. कंत्राटी किंवा बाह्ययंत्रणेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही. मात्र नव्याने रुजू झालेले कंत्राटी शिक्षक व कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी (ज्यांची सेवा ३ वर्षांनंतर नियमित होते) या स्पर्धेत खेळू शकतात. प्रथम नोंदणी करणाऱ्या ३२ संघांनाच प्रवेश दिला जाईल. प्रवेश शुल्क ५,००० रुपये आहे. प्रत्येक संघ एकाच प्रशासकीय विभागाचा असणे आवश्यक असून खेळाडूंकडे नियुक्ती प्राधिकरणाचे अधिकृत शासकीय ओळखपत्र अनिवार्य आहे.
इच्छुक संघांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपले परिपूर्ण अर्ज व खेळाडूंच्या ओळखपत्रांच्या प्रती सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष दिनेश सिनकर (८६६८५४०९७६ / ९०२८८३०४४८) किंवा अधिकृत प्रतिनिधी किरण वाडेकर (८२०८७५९८९७), साईस्वरूप मांडवकर (७७७६८९२२४३), पर्णिकेश सुर्वे (९९७५५५११०२) आणि अक्षय भोळे (९४०५७७२२२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी