ठाणे शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धा : मांडवी मुस्लिम अजिंक्य, स्पोर्टिंग क्लब उपविजेता
ठाणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। स्पोर्टिंग क्लब्स कमिटी ठाणे आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील सिलेक्शन ट्रायलसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शताब्दी चषक’ आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबने पहि
Thane


ठाणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। स्पोर्टिंग क्लब्स कमिटी ठाणे आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील सिलेक्शन ट्रायलसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शताब्दी चषक’ आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले.

स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या विहान आसवले याने अंतिम सामन्यातही दीड शतकी खेळी (१५६) साकारत स्पोर्टिंग क्लबला पहिल्या डावात २६८ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याला विहान पुजारी (४६) आणि अद्वैत कचराज (५२) यांनी मोलाची साथ दिली. मांडवी मुस्लिम तर्फे कनिष्क साळुंखे याने ६१ धावा देत चार बळी मिळवून प्रभावी गोलंदाजी केली.

प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना मांडवी मुस्लिम संघातर्फे आरव सिंग याने शानदार शतक झळकावले, तर कनिष्क साळुंखे याने ९५ धावांची दमदार खेळी केली. सर्वेश पोसम (४२) आणि उमर खान (३६) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यामुळे मांडवी मुस्लिम संघाने पहिल्या डावात ८ बाद ३२० धावांची मजल मारत ५२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आणि याच आघाडीच्या जोरावर शताब्दी चषकाचे अजिंक्यपद पटकावले.

स्पोर्टिंग क्लबतर्फे अर्जुन शिंगटे, विहान असवले आणि रशय सावंत यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील १४ वर्षांखालील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मुंबईच्या संघात स्थान मिळविण्याच्या दृष्टीने आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीच्या सदस्यांनी स्पर्धेतील प्रत्येक सामन्याला उपस्थित राहून खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण केले.

अंतिम सामन्याच्या नाणेफेकी प्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव डॉ. उन्मेश खानविलकर, स्पोर्टिंग क्लब्स कमिटीचे सचिव तथा नगरसेवक ॲड. विकास रेपाळे, उपाध्यक्ष विलास जोशी, सहसचिव श्रावण तावडे आणि सतीश नाचणे यांच्यासह ठाण्यातील क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या शताब्दी चषक स्पर्धेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande