‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम च्या भव्य यशानंतर, झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’मधून महिलांच्या सहलीतील मैत्री, नाती, स्वभाव आणि त्यातून रंगणारी धमाल अनुभवायला देणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘झिम्मा ३’ मधून एक नवा धमाका
Jhimma


मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम च्या भव्य यशानंतर, झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’मधून महिलांच्या सहलीतील मैत्री, नाती, स्वभाव आणि त्यातून रंगणारी धमाल अनुभवायला देणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘झिम्मा ३’ मधून एक नवा धमाका घेऊन येत आहेत. यावेळी सहलीचा बेत महिलांचा नसून पुरुषांचा आहे! इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, ‘सहलीला जायचं, जायचं सहलीला’ म्हणत पुरुषांची ही भन्नाट टोळी श्रीलंकेच्या सफरीवर निघाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी हेमंत ढोमे केवळ लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार नसून अभिनयातूनही या धमाल टोळीचा भाग होणार आहेत.

टीझरमधूनच या सहलीची रंगतदार झलक पाहायला मिळते. कोणी उत्साही, कोणी गंभीर, कोणी मिश्कील, तर कोणी आपल्या वेगळ्याच अंदाजात वावरणारा! वय, स्वभाव, विचार, जगण्याची पद्धत आणि प्रत्येकाची पार्श्वभूमीही निरनिराळी. अशा एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या असलेल्या या मंडळींची गाठ एका सहलीच्या निमित्ताने पडली आहे. आता या सगळ्यांना एकाच छताखाली, एकाच प्रवासात आणल्यानंतर काय धमाल उडणार? कोण कोणाच्या सुरात सूर मिसळणार आणि कोण कोणाला नाकीनऊ आणणार? याची उत्सुकता टीझरमुळे अधिकच वाढली आहे. सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, राजन भिसे, उदय सबनीस, सुयोग गोऱ्हे, अर्चित देवधर, सिद्धेश धुरी आणि अमेय वाघ अशी कलाकारांची तगडी फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

महिलांच्या सहलीतून नात्यांचे, मैत्रीचे आणि भावविश्वाचे अनेक रंग उलगडणाऱ्या ‘झिम्मा’ मालिकेत यावेळी पुरुषांच्या मैत्रीचा, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा आणि एकमेकांशी जुळवून घेताना होणाऱ्या गंमतीजमतींचा नवा पट उलगडणार आहे. श्रीलंकेचे निसर्गरम्य लोकेशन्स, वेगवेगळ्या स्वभावांची ही रंगतदार जुगलबंदी आणि अनपेक्षित प्रसंगांची रेलचेल यामुळे ‘झिम्मा ३’ची ही सहल प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची भन्नाट मेजवानी ठरण्याची चिन्हे आहेत. येत्या १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट नववर्षाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “’झिम्मा’ व ‘झिम्मा २’ला मिळालेल्या प्रेमामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. महिलांच्या सहलीतून अनेक सुंदर गोष्टी मांडल्यानंतर यावेळी पुरुषांच्या सहलीतून त्यांच्या स्वभावातील वेगळेपण, गंमतीजंमती आणि धमाल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात ५ वर्षांनी पुन्हा अभिनय करण्याची संधीही मिळाल्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी आणखी खास आहे. वेगवेगळ्या स्वभावांची ही मंडळी एकत्र आल्यावर पडद्यावर काय रंगत येते, हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. पण हा सिनेमा फक्त तिचा किंवा त्याचा न राहाता सगळ्यांचा होतो.’’

निर्मात्या क्षिती जोग म्हणतात, “’झिम्मा’च्या दोन्ही भागांना मिळालेलं प्रेम आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. त्यामुळे ‘झिम्मा ३’ करताना प्रेक्षकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन काहीतरी नवीन देणं महत्त्वाचं होतं. यावेळी पुरुषांची टोळी आणि श्रीलंकेची सफर हा एक वेगळाच अनुभव आहे. प्रत्येक कलाकाराचा स्वभाव आणि त्यांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री यातून एक वेगळीच धमाल रंगणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहात एकत्र हसण्याचा आणि आनंद घेण्याचा अनुभव देता येईल. आपला आनंदाचा खेळ अजून जास्त मनोरंजक ढंगात अनुभवता येईल.’’

निर्मात्या फाल्गुनी पटेल म्हणतात, “प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चित्रपट देणारे हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या ‘झिम्मा’ या लोकप्रिय चित्रपट मालिकेच्या तिसऱ्या भागाचा भाग होता येणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचा इरादा स्टुडिओज् हिरकणी या मराठी चित्रपटाच्या यशानंतर यावेळी एका नव्या संकल्पनेसह ‘झिम्मा ३’ मार्फत प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची वेगळी मेजवानी घेऊन येत आहे.”

लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा ३’ची निर्मिती क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल यांनी केली आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत महिलांच्या सहलीतून रंगलेला ‘झिम्मा’चा प्रवास आता पुरुषांच्या या भन्नाट टोळीसोबत श्रीलंकेत पोहोचणार असून, या सहलीत नेमकी कोणती धमाल रंगते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande