ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना मानद डी.लिट.पदवी प्रदान
मुंबई, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने आणि अष्टपैलू कलागुणांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपल्या प्रदीर्
D.Litt. Honoris Causa


मुंबई, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने आणि अष्टपैलू कलागुणांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासातून चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या सचिन पिळगावकर यांना आता मानद डी.लिट. (D.Litt. Honoris Causa) पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हा एक अभिमानास्पद आणि अविस्मरणीय क्षण ठरला आहे.

ग्वाल्हेर येथील आय.टी.एम. युनिव्हर्सिटीच्या ११ व्या दीक्षांत समारंभात सचिन पिळगावकर यांना हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही मानद पदवी देऊन गौरवले.

बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेता म्हणून विविध भूमिका साकारताना त्यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि गायक म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कलाकृतींनी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली, तर त्यांच्या कामातून नव्या पिढीतील कलाकारांनाही प्रेरणा मिळाली आहे.

या खास आणि अभिमानाच्या क्षणी त्यांच्या पत्नी, लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यादेखील उपस्थित होत्या. आयुष्यभराच्या कलासाधनेची आणि मेहनतीची पोचपावती देणारा हा सन्मान स्वीकारताना सचिन पिळगावकर यांच्यासाठी हा क्षण नक्कीच खास ठरला असेल.

कलाक्षेत्रातील योगदानाची विद्यापीठाकडून घेतली गेलेली दखल ही केवळ सचिन पिळगावकर यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर कलाकार, चाहते आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande